राज्य परिवहन महामंडळाकडून ज्येष्ठ नागरिक तसेच इतर सवलतधारकांना स्मार्टकार्ड देण्यात येत आहे. अशा प्रकारचे स्मार्ट कार्ड प्राप्त करवून घेण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांना ३१ मार्च पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली होती. मात्र कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता ज्येष्ठांना आगारात येऊन स्मार्ट कार्ड घेऊन जाणे शक्य होत नसल्याने तसेच त्याबाबतची माहिती आगारात येऊन देता येत नसल्याने त्यांची गैरसोय होत आहे. ही बाब लक्षात घेऊन महामंडळाने स्मार्ट कार्ड साठीची मुदत वाढवून दिली आहे.
ज्येष्ठांना आता स्मार्ट कार्डसाठी मोठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे. ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. त्यामुळे ज्येष्ठांकडे यापूर्वीची ओळखपत्रे सवलतीसाठी ग्राह्य धरली जाणार आहेत. याबाबतची माहिती राज्य परिवहन महामंडळाने सर्व आगारप्रमुखांना तसेच त्यांनी सर्व डेपोंना कळविली आहे.