नाशिक : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात सुरू असलेल्या मतदार नोंदणी अभियानाची मुदत शुक्रवार दि. २१ आॅक्टोबरपर्यंत वाढविण्यात आली आहे. विविध राजकीय पक्ष-संघटनांनी मुदतवाढीची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. दरम्यान, आतापर्यंत शहरात महापालिकेमार्फत ४५ हजार ८६१ नवमतदारांची नोंदणी झाली आहे.फेब्रुवारी २०१७ मध्ये महापालिकेची निवडणूक होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, महापालिका हद्दीत दि. १५ सप्टेंबर ते १४ आॅक्टोबर या कालावधीत मतदार पुनरीक्षण कार्यक्रम राबविण्यात आला. महापालिकेने त्यासाठी ६१ प्रभागांत प्रत्येकी एक मतदान नोंदणी केंद्र उभारले होते. याशिवाय, सहाही विभागीय कार्यालय आणि शहरातील २३ महाविद्यालयांमध्ये मतदार नोंदणी कक्ष उभे केले होते. त्यानुसार, ४५ हजार ८६१ नवीन मतदारांनी नोंदणीसाठी अर्ज केले आहेत. ३४ मतदारांची नावे वगळण्यात आली असून, १०४८ मतदारांच्या नाव-पत्त्यात दुरुस्ती करण्यात आली आहे, तर १३६७ मतदारांनी स्थलांतर केले आहे. सर्वाधिक १० हजार ४५१ नवमतदारांची नोंदणी नाशिकरोड विभागात करण्यात आली आहे. तर सर्वात कमी १४२३ नवमतदार उच्चभ्रू वस्ती समजल्या जाणाऱ्या नाशिक पश्चिम विभागात नोंदले गेले आहेत. महापालिकेने महाविद्यालयांमध्येही मतदार नोंदणी कक्ष उभे केले होते. स्वत: आयुक्त अभिषेक कृष्ण, उपआयुक्त विजय पगार यांनी महाविद्यालयांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला होता. त्याला प्रतिसाद मिळत ४२२३ विद्यार्थ्यांनी नवमतदार म्हणून अर्ज केले आहेत. दरम्यान, आठवडाभरात शहरातील तणावपूर्ण स्थिती यामुळे अनेकांना घराबाहेर पडणे मुश्कील बनले होते. त्यामुळे मतदार नोंदणीसाठी मुदत वाढवून देण्याची मागणी काही राजकीय पक्ष-संघटनांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. त्यानुसार, नोंदणीची मुदत दि. २१ आॅक्टोबरपर्यंत वाढविण्यात आली असल्याची माहिती उपआयुक्त विजय पगार यांनी दिली.
मतदार नोंदणीसाठी मुदतीत वाढ
By admin | Published: October 16, 2016 1:27 AM