नाशिक : वायुप्रदूषणामुळे होणारे दुष्परिणाम दुरगामी आहेत. त्यामुळे हवेच्या गुणवत्तेत सुधार करण्यासाठी शासकीय यंत्रणांद्वारे व्यापक प्रयत्न केले जात असून, गुणवत्तेच्या पातळीचे मापन आणि पृथ्थकरण करण्यासाठी व्यापक साधनांचा वापर केला जात आहे. मात्र, त्याचबराेबर जनजागृतीची अत्यंत गरज असून, व्यापक प्रयत्नांची गरज असल्याचे मत विविध क्षेत्रातील मान्यवरांनी व्यक्त केले. नुकत्याच झालेल्या पर्यावरण दिनाच्या निमित्ताने स्विस एजन्सी फॉर डेव्हलपमेंट अँड कोऑपरेशनच्या सहकार्याने क्लीन एअर प्रोजेक्ट फॉर इंडिया अंतर्गत ऊर्जा एवं संसाधन संस्थान (टेरी) द्वारा स्वस्थ परिसंस्थेसाठी हवेच्या गुणवत्तेच्या वर्धनासाठी वेबिनार संपन्न झाले. नाशिक शहरासह हवा गुणवत्तेत सुधारणा करण्यासाठी राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था, ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया यासारख्या स्थानिक संस्था प्रयत्न करीत असून, त्या अनुषंगाने हा वेबिनार पार पडला.
यावेळी टेरीचे महासंचालक डॉ. विभा धवन यांनी वायुप्रदूषण रोखण्यासाठी नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा असल्याचे नमूद केले, तर एसडीसीचे प्रमुख जोनाथन डिमंगे यांनी हवा गुणवत्तेसाठी सर्वांनीच व्यापक प्रयत्न करण्याची गरज असल्याचे नमूद केले. नवी दिल्ली येथील एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरीया यांनी वायुप्रदूषणाचे श्वसनावर होत असलेल्या परिणामांची माहिती दिली. यावेळी सीएसपी इंडियाचे प्रकल्प प्रमुख सुमित शर्मा यांनी वायुप्रदुषणाचा केवळ मानवी आरोग्यावरच नव्हे, तर देशाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होत असल्याचे सांगितले. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सहसंचालक व्ही. एम. मोटघरे यांनी महाराष्ट्रात वायुप्रदूषण कमी करण्यासाठी सुरू असलेल्या व्यापक योजनांची माहिती दिली आणि हवेतील गुणवत्तेत वाढ हेाऊन प्रदूषण कमी हेाईल असा विश्वास व्यक्त केला. यावेळी उत्तर प्रदेश येथील प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव आशिष तिवारी हे देखील वेबिनारमध्ये सहभागी हाेते.
इन्फेा..
नाशिक हे औद्योगिकदृष्टया प्रगत शहर असले तरी उद्योग, वाहतूक आणि धूळ हे हवेच्या गुणवत्तेला मारक ठरत आहे. त्यामुळे वायू गुणवत्ता मानक एनएमक्युएसमध्ये निकषाप्रमाणे प्रदूषणात वाढ होत असल्याचे आढळत आहे. त्यावर चर्चा करण्यात आली. या वेबिनारमध्ये येथील हवेतील गुणवत्ता वाढवण्यासाठी घन कचरा व्यवस्थापन, निरुपयोगी बांधकाम साहित्याची यथायोग्य विल्हेवाट, ई कचऱ्याची विल्हेवाट, प्रदूषणकारी वाहनांवर नियंत्रण या महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.