पाथरे : सिन्नर तालुक्यातील पाथरे येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे. त्यामुळे परिसरातील ग्राहकांना अनेक गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. येथील वीज कार्यालयातील रिक्त पदे भरण्यासह कर्मचारी संख्या वाढविण्याची मागणी होत आहे. ३२ केव्ही क्षमता असलेल्या येथील वीज उपकेंद्र कार्यालयात पूर्वी पुरेसी कर्मचारी संख्या होती; मात्र बदली, सेवानिवृत्ती आदि कारणांमुळे रिक्त झालेल्या पदांवर पुन्हा नेमणुका करण्यात न आल्याने उर्वरित कर्मचाऱ्यांनाच अतिरिक्त कामाचा भार पेलावा लागत आहे. या कार्यालयास पूर्णवेळ शाखा अभियंता नाही. नांदूरशिंगोटे येथील शाखा अभियंत्यावरच पाथरे उपकेंद्राची जबाबदारी सोपविण्यात आलेली आहे. याशिवाय कार्यालयात मदतनीस, लाईनमन व वायरमन ही पदे रिक्त आहेत. नाशिक जिल्ह्याच्या टोकावर असल्याने पाथरे येथे नेमणुकीस कर्मचारी नाखूश असल्याची चर्चा आहे. कर्मचारी कामास टाळाटाळ करीत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे स्थानिक अथवा परिसरातील कर्मचाऱ्यांचीच पाथरे वीज उपकेंद्रात नेमणूक करण्याची मागणी होत आहे. येथील उपकेंद्रातील रिक्त कर्मचाऱ्यांची पदे भरण्यासाठी ग्रामपंचायत, विविध संघटना व ग्रामस्थांनी अनेकदा पाठपुरावा करूनही कार्यवाही होत नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे. पाथरे वीज उपकेेंद्रात पूर्णवेळ शाखा अभियंत्यासह मदतनीस, लाईनमन व वायरमन ही पदे तातडीने भरून कर्मचारी संख्या वाढविण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. (वार्ताहर)
वीज कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त भार
By admin | Published: September 08, 2015 11:01 PM