भरत महाराज मिटकेवारी शब्द उच्चारताच आषाढी कार्तिकीला पंढरपूरकडे जाणाऱ्या भाविक भक्तांचे चित्र उभे राहते. महायोगपीठ पंढरपूरकडे दिंड्या, पताका घेऊन टाळ मृदंगाच्या ठेक्यात नाचत रामकृष्णहरी या बीजमंत्राचा व ज्ञानोबा तुकाराम गजर करीत ठेक्यात पाऊल टाकणारा, एकटांगी धोतर, कपाळी गंध टिळा व त्याला शोभून दिसणारा बुक्का लावलेला विठ्ठलभक्तांचा मेळा डोळ्यासमोर उभा राहतो. वारकरी हे आपापल्या गावच्या दिंडीत सहभागी होऊन श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी चाललेले असतात. महाराष्ट्रातूनच नव्हे तर जगभरातून विठ्ठलभक्त वारकरी पंढरपूरकडे रवाना होतात. वारी-वारकरी-दिंडी या शब्दाचा ढोबळ अर्थ पाहता प्रथमच लक्षात येते की, वारणे, दूर सारणे, दूर करणे, टाकून देणे.वारणे म्हणजे काय वारायचे? काय सारायचे? काय दूर करायचे? वरील गोष्टी दूर सारून टाकून द्यायच्या काय तर वारीत अनिष्ट, वाईट विचार करायचा नाही. त्यापासून दूर अंतरावर राहून वाट चालायची. अयोग्य आचरणापासून सावध राहून आचरण करायचे. दुसºयाला त्रास होणार नाही याची काळजी घ्यायची व आचरण करायचे या सर्व गोष्टींचे भान ठेवून पंढरपूरला जायचे, यायचे. येरझाºया घालणे म्हणजे वारी. या संपूर्ण गोष्टीचे आचरण करून येरझाºया घालतो तो वारकरी. चांगल्या गुणांचे आचरण करत विठ्ठलाच्या दर्शनासाठी जाणारा तो वारकरी. पंढरपूरला जाऊन विठ्ठल चरणी नतमस्तक होऊन समर्पित होतो तो वारकरी. नुसताच समर्पित होऊन दर्शन घेणारा नव्हे तर नित्यनेमाने आषाढी कार्तिकीला न चुकता जाणारा-येणारा तो वारकरी. तेवढ्याच काळात नव्हे तर अखंड आचरणात भेदाभेद न मानणारा तो वारकरी. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म! भेदाभेद भ्रम अमंगळ!! लहान-मोठा, गरीब- श्रीमंत, जातीचे समाजाचे, उच्च-नीचतेचे, भेद न मानणारा तो वारकरी. या सर्व विचारांची धारणा अंगी बाळगून नित्यनेमाने ठराविक वेळी व दिवशी पंढरपूरला जाणारा तो वारकरी.होय होय वारकरी! पाहे पाहे रे पंढरी!! काया वाचा मनें! सर्वस्वे उदार! बाप रखुमादेवी वर! विठ्ठलाचा वारीकर!! वाट पाहे उभा भेटीची आवडी! कृपाळू तातडी उतावीळ!! एकमेकांच्या भेटीच्या आवडीतूनच वारीची प्रथा सुरू झाली असावी. येणाऱ्यांना भेटीची आवड व त्यांना पाहण्याची देवाला गोडी लागली असावी त्यातूनच वारीची कल्पना उदयास आली असावी. जावे पंढरीसी आवडे मानसी! कधी एकादशी आषाढी ये!! तुका म्हणे ऐसे आर्त ज्याचे मनी! त्याची चक्र पाणी वाट पाहे. अभिमान नुरे! कोड अवघेचि नुरे!! ते या पंढरी घडे! खळा पाझर रोकडे!! नेत्री अश्रुंचिया धारा! कोठे रोमांच शरीरा! तुकाराम म्हणे डोळा! विठू बैसला सावळा!! म्हणून ज्ञानाचा अभिमान घालविण्यासाठी पंढरीस जावे. भक्तिप्रेमसुख लुटण्यासाठी, कृतज्ञता बुद्धी प्रकट करण्यासाठी पंढरीस जावे. कारण ऐसी चंद्रभागा ऐसे भीमातीर! ऐसा विटेवर देव कोठे!! पंढरीच्या लागा वाटे! सखा भेटे विठ्ठल!! म्हणून जन्माला आल्यानंतर पंढरीची वारी प्रत्येकाने करावी. तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक! विठ्ठलाची एक देखिलया!! पंढरीची वारी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक लोकजीवनाचा संस्कार प्रवाह व भक्तिप्रेमाची अनुभूती, सदाचाराची, नैतिकतेची मूर्तिमंत पाठशाला म्हणजे वारी. परब्रह्माला अंत:करणात साठवून विवेकाच्या दिशेने पडणारी पावले भगवंताच्या दर्शनाला नेणारा मार्ग म्हणजे वारीची पाऊलवाट भक्ती, निती, कृती यांचा समन्वय साधून परमार्थ घडवणार व्यक्तिमत्व म्हणजे वारकरी. ज्ञानेश्वरांचे ज्ञान, तुकारामांची भक्ती, नामदेवांचे नाम व प्रिती, एकनाथ महाराजांची एकनिष्ठता यांचे विराट दर्शन आणि आध्यात्मिक सुख व एकात्मतेची गंगोत्री आणि आत्यंतिक दु:खाची निवृत्ती व परमानंद सुखाची प्राप्ती म्हणजे वारी होय.(लेखक अ.भा. वारकरी मंडळाचे जिल्हा सरचिटणीस आहेत)