लोहोणेर : चौदाव्या वित्त आयोगातून ऐंशी वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या लोहोणेर ग्रामपंचायतीच्या ऐतिहासिक दगडी व कौलारू इमारतीची दुरुस्ती व रंगरंगोटी केल्याने वास्तूचे खऱ्या अर्थाने रुपडे पालटले आहे.
या इंग्रज काळातील इमारतीने आता कात टाकली असून, देखण्या रूपामुळे लोहोणेरच्या वैभवात भर पडली आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात इंग्रजांच्या राजवटीत सुमारे ८० वर्षांपूर्वी दि. ३१ जानेवारी १९४१ ला लोहोणेर येथे ग्रुप ग्रामपंचायतीची स्थापना झाली. कालांतराने या ग्रुप ग्रामपंचायतीत समाविष्ट असलेल्या गावांमध्ये स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन झाल्याने लोहोणेर ग्रामपंचायतीचा भार हलका झाला.
पहिले सरपंच म्हणून श्रीधर विष्णू देशपांडे यांनी पदभार सांभाळला होता. काही वर्षांनी ही दगडी व कौलारू इमारत मोडकळीस आल्याने माजी सरपंच बाळासाहेब बच्छाव यांच्या कालावधीत तत्कालीन आ. शंकर अहिरे यांच्या निधीतून ग्रामसचिवालयाची इमारत उभी राहिली होती. या इमारतीत ११ फेब्रुवारी २००४ रोजी कामकाज सुरू करण्यात आले. या इमारतीत काही काळ प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू केले होते. या केंद्रासही स्वतःची जागा मिळाल्याने ही वास्तू भग्नावस्थेत पडली होती.
या इमारतीच्या दुरुस्तीसाठी नागरिकांनी वारंवार मागणी केल्याने १४ व्या वित्त आयोगातून ६.९९ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला. या इमारतीलगत असलेल्या पुरातन महादेव मंदिरालाही या कामामुळे उजाळा मिळाला आहे. या इमारतीच्या आवारात सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांच्यासाठी स्वतंत्र दालन निर्माण केले आहे. आलिशान बैठक सभागृहाची व्यवस्था करण्यात आली असल्याने आता लोहोणेर ग्रामपंचायत खऱ्या अर्थाने डिजिटल व अत्याधुनिक व्हावी, अशी ग्रामस्थांची अपेक्षा आहे.लोहोणेर येथे ब्रिटिशकालीन इमारतीमध्ये ग्रामपंचायतीचे सुसज्ज असे कार्यालय व्हावे म्हणून जाणकार मंडळी सतत प्रयत्न करीत होते. त्यामुळे या इमारतीच्या दुरुस्ती व देखभालीसाठी १४ व्या वित्त आयोगातून निधी उपलब्ध झाला आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर ग्रामपंचायतीचे स्वतंत्र कार्यालय सुरू होईल.- यु. बी. खैरनार, ग्रामविकास अधिकारी, लोहोणेर