नाशिक : कोरोना उपचारासाठी दाखल होणाऱ्या रुग्णांना त्यांच्या आजारापेक्षाही एकटे रहावे लागणे, कुटुंबीयांशी मनमोकळा संवाद साधता न येणे, परवानगी नसल्याने कक्षातून रुग्णाचे दर्शनदेखील दुरापास्त असल्याने कुटुंबीयांच्या चिंतेत भर पडत आहे. या पार्श्वभूमीवर आता जिल्हा रुग्णालयातील कोरोनाग्रस्तांना त्यांच्या कुटुंबीयांसमवेत व्हिडिओ कॉलद्वारे संपर्क साधता यावा, यासाठी सिव्हिलकडून सहा मोबाइल फोनची सुविधा येथील कोविड सेंटरमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे.कोरोनाग्रस्तांनी दिवसभरात काही गोळ्या घेतल्यानंतर त्यांना दिवसभरातील अन्य कोणतेही व्यवधान पाळावे लागत नाही. त्यामुळे डोक्यात केवळ आपल्या प्रकृतीची चिंता, आपण बरे होऊ किंवा नाही याबाबतचा विचार सतावत राहतो. अशावेळी आपल्या कुटुंबातील कुणी जवळच्या व्यक्तीने धीराचे आणि प्रेमाचे शब्द बोलले तर रुग्णाला आधार वाटतो. या संपूर्ण कालावधीत रुग्णाचे मानसिक धैर्य टिकवून ठेवणे अत्यंत महत्त्वाचे असते. त्यामुळे त्याचा कुटुंबाशी संवाद होणे, कुटुंबातील व्यक्तींना रुग्ण व्यवस्थित असल्याचे दिसणे या सर्व बाबी अत्यंत मोलाच्या ठरतात. या सर्व बाबींचा विचार करून जिल्हा रुग्णालय प्रशासनाने कोरोना केंद्रात दाखल असलेल्या कोरोनाग्रस्तांसाठी मोबाइल घेण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हा रुग्णालयातील कोरोना केंद्रात सध्या ४७ बाधित रुग्ण दाखल असून, संशयित मिळून एकूण ८० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. या सर्व बाधितांना ही सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.