नाशिक : स्पर्धा परीक्षेच्या तयारीकरिता आवश्यक पुस्तके व साहित्य सहज उपलब्ध व्हावे यासाठी सीबीएसजवळील जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रात करिअर ग्रंथालय व अभ्यासिका सुरुवात उपलब्ध करून देण्यात आली आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना शासकीय कामकाजाच्या दिवशी सकाळी १० ते सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत या अभ्यासिका व ग्रंथालयाचा फायदा घेता येणार आहे. विविध स्पर्धा परीक्षांच्या तयारीकरिता एक हजार पुस्तकांसह अन्य साहित्य या अभ्यासिकेत विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आले असून, यात केंद्रीय लोकसेवा आयोग, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, तलाठी, ग्रामसेवक, शिक्षक पात्रता परीक्षा, स्टाफ सिलेक्शन कमिशन, लिपिक, टंकलेखक, आयबीपीएस, एसबीआय बँक भरती, आरोग्य सेवक भरती आदी विविध स्पर्धा परीक्षांच्या तयारीकरिता आवश्यक पुस्तके उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे स्वत:चा उद्योग व्यवसाय करू इच्छिणाºयांसाठी याबाबतची सखोल व शास्त्रीय ज्ञान व माहिती उपलब्ध व्हावी यासाठी विविध मार्गदर्शनपर पुस्तकेही या ग्रंथालयात समाविष्ट असल्याची माहिती केंद्राचे सहायक संचालक संपत चाटे यांनी दिली आहे.अभ्यासिकेत सकाळी १० ते दुपारी २ आणि दुपारी २ ते सांयकाळी ६ वाजेपर्यंत अशा प्रत्येकी चार तासांच्या दोन सत्रांमध्ये प्रवेशासाठी नोंदणी सुरू करण्यात आली आहे. जागा उपलब्ध असेपर्यंत प्रथम येणारास प्रथम प्राधान्य पद्धतीने प्रवेश देण्यात येणार असून, इच्छुक उमेदवारांनी आधारकार्ड व इतर ओळखपत्रासह जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रात संपर्क साधावा- संपत चाटे, सहायक संचालक, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र
स्पर्धा परीक्षा अभ्यासाकरिता मोफत अभ्यासिके ची सुविधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2018 12:46 AM