नाशिक : महापालिकेची रुग्णालये असूनही त्याचा उपयोग होत नसल्याच्या लोकप्रतिनिधींच्या तक्रारींनंतर प्रशासनाने धावपळ करून आता गंगापूर गाव तसेच नाशिकरोड येथील सिन्नर फाटा येथील रुग्णालयांमध्ये प्रसूतिगृह सुरू करण्याच्या कामाला वेग दिला आहे. प्रशासन सध्या २८ डॉक्टरांची भरती करत असून, त्यातील काहींची या दोन रुग्णालयांत नियुक्ती करण्यात येणार आहे.गंगापूर आणि सिन्नर फाटा ही दोन्ही रुग्णालये परिसरातील नागरिकांच्या दृष्टीने महत्त्वाची आहेत, परंतु तेथे कोणत्याही सुविधा नाहीत. महापौर रंजना भानसी यांनी प्रभाग दौरे सुरू केल्यानंतर पहिल्याच दिवशी सिन्नर फाटा येथील मनपा रुग्णालयाला भेट देत प्रशासनाचे वाभाडे काढले होते, तर सभागृह नेता दिनकर पाटील यांनीदेखील गंगापूर येथील सुसज्ज रुग्णालयात गेल्या पंधरा वर्षांत एकही प्रसूती झाली नसल्याचा प्रकार उघड करून अधिकाऱ्यांना लक्ष्य केले होते. स्थायी समितीच्या बैठकीत त्यांनी हा विषय लावून धरला होता. त्यानंतर मात्र आता प्रशासनाने हालचाली केल्या असून, २८ डॉक्टरांची भरती मोहीम सुरू केली आहे. आत्तापर्यंत २० इच्छुकांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. येत्या १६ नोव्हेंबरपर्यंत प्रतिसाद वाढेल. त्याचप्रमाणे त्यांच्या मुलाखती घेतल्यानंतर काही वैद्यकीय अधिकाºयांची नियुक्ती सिन्नर फाटा आणि नंतर गंगापूर रुग्णालयात करण्यात येईल, त्यानंतर तेथे प्रसूतिबरोबरच अन्य सुविधा उपलब्ध होऊ शकतील. अर्थातच डॉक्टरांच्या भरतीची प्रक्रिया पार पाडल्यानंतर रुग्णालयाच्या इतर स्टाफसाठीदेखील भरतीप्रक्रिया राबविली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.दोन नवी केंद्रेशहर परिसरातील नागरिकांची गरज लक्षात घेऊन आरोग्य केंद्रे सुरू केली जातात. म्हसरूळ आणि मखमलाबाद यान दोन ठिकाणी नवीन आरोग्य केंद्रे सुरू करण्यात आली आहेत.ऐन रोगराईच्या काळात महापालिकेची आरोग्य यंत्रणा अपुरी पडली तसेच रुग्णालयांत पुरेशा सुविधा मिळाल्या नसल्याची तक्रार सातत्याने होत होती. त्यातच पंधरा शहरी आरोग्य केंद्रेदेखील बंद पडली होती. त्यात आता सुधारणा करण्यात येत आहे. गोरेवाडी येथे आरोग्य केंद्राच्या दुरुस्ती केंद्राचे काम हाती घेण्यात आले आहे. सिडको आणि मुलतानपुरा येथे नव्याने बांधकाम सुरू आहे. महापालिकेच्या मिळकतीत आणि विशेषत: बंद पडलेल्या शाळा किंवा वापरात नसलेल्या समाजमंदिरांचा उपयोग करून घेण्यात येत आहे. त्यामुळे नजीकच्या काळात पंधरा आरोग्य केंद्रे पूर्ववत सुरू होतील, असे वैद्यकीय अधीक्षक डॉ. राहुल गायकवाड यांनी सांगितले.
सिन्नर फाटा, गंगापूरच्या रुग्णालयांत प्रसूतिगृहाची सुविधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2018 12:56 AM