नाशिक : खासगी वा सरकारी मनोरुग्णालये आणि मानसोपचार केंद्रांमध्ये विशेष कायद्यान्वये मानसिक व मनोरुग्णांच्या उपचारासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरण केंद्राचे सचिव तथा न्यायधीश एस. एम. बुक्के यांनी मंगळवारी (दि़२८) दिली. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण केंद्र व प्रबोधनी विद्या मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने पंडित कॉलनीतील लेन नंबर दोनमधील प्रबोधनी विद्या मंदिरात मनोरुग्ण व मानसिक रुग्णांच्या पालकांसाठी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरात बुक्के बोलत होते. न्यायाधीश बुक्के यांनी यावेळी मनोरुग्ण व मानसिक अपंग व्यक्तींचे अधिकारी व त्यांच्याबाबत पालक व समाजाचे कर्तव्य याविषयीची कायदेशीर माहिती दिली. मानसिक आरोग्य कायदा १९८७ च्या कलम २३ नुसार भटक्या आणि बेघर मनोरुग्ण वा हिंसक-घातक वर्तनाच्या मनोरुग्ण व्यक्तीस पोलिसांना ताब्यात घेता येईल़ तसेच कलम २४ नुसार मुख्य न्यायाधीशांसमोर सादर करून त्यांच्या आदेशान्वये पुढील उपचारासाठी मनोरुग्णालय वा मानसोपचार केंद्रात उपचारासाठी दाखल करता येईल़ यावेळी विद्यालयाच्या मुख्याध्यापका श्रीमती आर. व्ही. वनीस यांच्यासह मनोरुग्ण मुलांचे पालक व शाळेतील शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.
विशेष कायद्यान्वये मनोरुग्णांच्या उपचारासाठी सुविधा : बुक्के
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2018 1:22 AM