नाशिक : सातपुर औद्योगिक वसाहतीमध्ये असलेल्या हर्षिता इलेक्ट्रीकल्स व केबीबी इंडस्ट्रीज नावाच्या कंपनीत गुरूवारी (दि.१५) सुमारे ५० ते ६० गुंडांच्या जमावाने बळजबरीने रात्रीच्या सुमारास प्रवेश करत धुडगूस घातल्याची घटना उघडकीस आली आहे. गुंडांनी सुमारे पावणे चार कोटींची यंत्रसामुग्री ट्रकमध्ये भरून पोबारा केला असून येथील महिला सुरक्षारक्षकांना मारहाण करत विनयभंग केल्याप्रकरणी सातपुर पोलिसांनी सात संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
फिर्यादी भाऊसाहेब ठाणसिंग गिरासे यांच्या मालकीच्या हर्षित इलेक्ट्रीकल कंपनीत (केबीबी) एका टोळक्याने गुरुवारी (दि.१५) रात्री साडे दहा ते अकरा वाजेच्या सुमारास कोयते, तलवारी, लोखंडी रॉड, गावठी कट्टे घेऊन हल्ला केला. यावेळी तेथे असलेल्या तीन महिला व दोन सुरक्षारक्षकांचे मोबाइल जप्त करून घेत त्यांना डांबून ठेवले. कारखान्यातील यंत्रसामुग्रीची तोडफोड करण्यास सुरूवात केली. संशयितांनी रात्रभर कंपनीत धुडगूस घालत यंत्रसामुग्रीची नासधूस केली.
क्रेनच्या सहाय्याने ३ कोटी ८५लाख २५ हजार रुपयांची यंत्रसामुग्री तीन ट्रकमध्ये भरून लांबविल्याचे फिर्यादी गिरासे यांनी म्हटले आहे. सातपुर पोलिसांनी संशयित केसरसिंग शेखावत (३०), रोहितराजेश गोरण ( २८), रितेश राकेश बुरट (२५), पंकज मदनलाल लोट ( ३२), सुरज शंभुजी टाक (३२), दिग्विजय गोवर्धनसिंग (३८), अजय इंदरलालजी लोट (३६) यांच्याविरुद्ध दरोडा, विनयभंग तसेच शस्त्र अधिनियमांतर्गत विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास उपनिरीक्षक अश्विनी उबाळे या करीत आहेत.
सीसीटीव्ही फुटेजवरून तपास
कंपनीत केलेला हल्ला व यंत्रसामुग्रीची लूट आणि महिला सुरक्षारक्षकांसोबत गैर वर्तणुकीचा तपास सातपुर पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेजद्वारे केला जात आहे. काही फुटेज पोलिसांच्या हाती लागले आहेत. पोलिसांनी घटनास्थळावरून शुक्रवारी पहाटेच्या सुमारास वरीलपैकी काही संशयितांना ताब्यातदेखील घेतल्याचे सूत्रांनी सांगितले.