कळवण- साडेतीन शक्तीपीठांपैकी आद्यस्वयंभू शक्तीपीठ असलेल्या सप्तशृंगी देवीच्या गडावर शुक्रवारी रात्री कीर्ती ध्वज फडकावित चैत्रोत्सवाची सांगता करण्यात आली. किर्तीध्वजाचे मानकरी एकनाथ गवळी पाटील यांनी गडावरील शिखरावर ध्वज लावला. चैत्रोत्सव काळात तब्बल १६ लाख देवीभक्त नतमस्तक झाले. चैत्रोत्सवासाठी लाखो भाविक शेकडो मैलांचा प्रवास करत तळपणारे उन, आणि उरात भगवतीच्या भेटीची ओढ घेऊन लाखोंच्या संख्येने उत्तर महाराष्ट्रातून भाविक भक्त अनवाणी पावलांनी सप्तशृंगगडावर दाखल होऊन भगवतीचरणी लिन झाले.
श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्टच्या मुख्य कार्यालयातून पारंपारिक पद्धतीने मानकरी पुजारीसह कीर्ती ध्वजाची विधिवत पूजा मुख्य जिल्हा सत्र न्यायाधीश सूर्यकांत शिंदे, जिल्हा न्यायाधीश तथा सप्तशृंग निवासनी देवी ट्रस्टच्या अध्यक्ष श्रीमती यू एन नंदेश्वर, विश्वस्त डॉ रावसाहेब शिंदे, राजेंद्र सुर्यवंशी, व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे ध्वजाचे मानकरी दरेगावचे गवळी कुटुंबीय, पोलीस पाटील शशिकांत बेनके पाटील, शिवसेनेचे गिरीश गवळी, सरपंच राजेश गवळी, माजी सरपंच संदीप बेनके पाटील , पोलीस निरीक्षक सुजय घाटगे पोलीस उप निरीक्षक विनोद जाधोर आदीसह नागरिक उपस्थित होते. मान्यवर कुटुंबियांच्या हस्ते किर्ती ध्वजाची विधिवत पूजाअर्चा होऊन देवस्थानच्या मुख्य कार्यालयापासून शिरपूरच्या गोल्डन बँडच्या गजरात पहिल्या पायरीपर्यंत मिरवणूक काढण्यात आली.किर्तीध्वजाचे मानकरी एकनाथ गवळी पाटील व सहकारीकडे किर्तीध्वज सुपूर्द करण्यात आला. सप्तशृंगी माता की जय, परशुराम बाला की जय, मार्कंडेय महाराज की जय असा जयघोष करीत गड परिसर दुमदुमून गेला होता. किर्तीध्वज मिरवणूक दरम्यान लाखोच्या संख्येने भाविकांनी गर्दी केल्याने पोलीस निरीक्षक सुजय घाटगे , जनसंपर्क अधिकारी भिकन वाबळे, माजी सरपंच संदीप बेनके पाटील, सरपंच राजेश गवळी, मयुर बेनके, गणेश बर्डे यांनी गर्दी नियंत्रणात आणण्यात यश मिळवले.मध्यरात्री १२ वाजता सप्तशृंगीच्या शिखरावर भगव्या रंगाचा किर्तिध्वज फडकविण्यात आल्यानंतर किर्तीध्वजाचे दर्शन शनिवारी पहाटे पासून देवीभक्त व भाविकांनी घेतले.