नाशिक : गोवा विधानसभा निवडणुकीत भाजपने बहुमत मिळाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी ह्यअब महाराष्ट्र बाकी हैह्ण या दिलेल्या घोषणेची पालकमंत्री छगन भुजबळ यांनी खिल्ली उडविली असून, महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार पाच वर्षे पूर्ण करेल, तोपर्यंत फडणवीस यांनी अडीच वर्षे वाट पहावी असा टोला लगावला आहे. नाशिक दौऱ्यावर आलेले पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याशी प्रसिद्धिमाध्यमांच्या प्रतिनिधींनी संवाद साधला असता, त्यांचे लक्ष माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याकडे वेधले त्यावेळी त्यांनी उपरोक्त प्रतिक्रिया दिली. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून सरकार पडणार, पाडणार असे अनेक मुहूर्त काढण्यात आले. परंतु सरकार चांगले कामकाज करीत आहे. गोवा निवडणुकीच्या निकालावरून जर महाराष्ट्र जिंकायचा असेल तर त्यासाठी फडणवीस यांना अजून अडीच वर्षे वाट पहावी लागणार असल्याचे भुजबळ म्हणाले. चीनमधील नवीन कोरोना व्हायरंटचा सर्वाधिक धोका महाराष्ट्र व केरळला असल्याचा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने दिला असल्याच्या प्रश्नावर बोलताना भुजबळ यांनी त्यामुळे घाबरून जाण्याचे कारण नाही, महाराष्ट्र सर्वतोपरी खबरदारी घेतो आहे. आता उत्तर प्रदेशच्या निवडणुका संपुष्टात आल्याने योगी मुख्यमंत्री होतील व त्यांच्या राज्यातील जनता रोजीरोटीसाठी महाराष्ट्रात येतील, असा चिमटा काढला. दरम्यान, ओबीसी आरक्षणप्रश्नी माजी मुख्य सचिव बांठिया यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली असून, ही समिती येत्या दोन महिन्यात ओबीसींच्या संख्येचा अहवाल देईल व कोणत्याही परिस्थितीत ओबीसींना आरक्षण बहाल होईल, असेही शेवटी भुजबळ यांनी सांगितले.
फडणवीसांनी अडीच वर्षे वाट पहावी छगन भुजबळ : अनेक मुहूर्त हुकल्याचा टोला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2022 12:20 AM