पाच वर्षांनंतर पहिल्यांदाच विधानमंडळाने गठित केलेली पंचायत राज समिती नाशिक जिल्हा परिषदेच्या दौऱ्यावर येत असून, २५ ते २७ ऑगस्ट असे तीन दिवस समिती मुक्कामी तळ ठोकणार आहे. या काळात सन २०१६-१७च्या लेखापरीक्षा पुनर्विलोकन अहवाल तसेच सन २०१७-१८ चा वार्षिक प्रशासन अहवालावर ही समिती आढावा घेणार आहे. समितीच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर लेखापरीक्षा पुनर्विलोकन अहवालातील परिच्छेदांच्या माहितीबाबतच्या प्रती तसेच वार्षिक प्रशासन अहवालावरील प्रश्नावली व याबाबतची माहिती १७ ऑगस्टपर्यंत विधानमंडळाने मागविली आहे. या माहितीपुस्तिकेची प्रत्येकी एक प्रत सर्व समित्यांच्या प्रमुखांंना व सदस्यांना अभ्यासासाठी पाठविण्यात यावी अशीही सूचना देण्यात आली आहे. ही समिती २५ ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता शासकीय विश्रामगृहावर येईल व जिल्ह्यातील आमदारांशी चर्चा करेल. त्यानंतर जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर जिल्हा परिषदेला भेट देतील व लेखापरीक्षा पुनर्विलोकन अहवालाबाबत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची साक्ष नोंदवतील. गुरुवार, दि. २६ रोजी समितीचे सदस्य पंचायत समित्या, प्राथमिक आरोग्य केंद्रे, जिल्हा परिषद शाळा, ग्रामपंचायतींना भेटी देऊन प्रत्यक्ष कामकाजाची पाहणी करतील. अखेरच्या दि. २७ ऑगस्ट रोजी जिल्हा परिषदेत सन २०१७-१८ या वर्षाचा वार्षिक प्रशासन अहवालासंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची साक्ष घेतील.
या पत्रामुळे पंचायत राज समितीचा दौरा जवळपास निश्चित झाल्याचे मानले जात असून, सद्य:स्थितीत कोरोनाची स्थिती पाहता, समितीसोबत येणारा लवाजमा व यंत्रणेतील अधिकाऱ्यांची गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन समितीने दौरा काही काळासाठी स्थगित करण्याचे प्रयत्न जिल्हा परिषदेमार्फत केले जात आहेत. त्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी व मंत्र्यांकरवी समितीचे अध्यक्ष व सदस्यांची मनधरणी केली जात असली तरी, दौरा रद्द झाला नाही तर समितीला सामोरे जाण्यासाठी प्रशासनाने दुसरीकडे जय्यत तयारीही चालविली आहे.