पंचवटी : महापालिकेच्या सहाव्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी प्रभाग रचना व आरक्षण जाहीर झाल्यानंतर ज्या त्या प्रभागात इच्छुकअसलेल्या इच्छुकांच्या निवडणूक चर्चा रंगण्यास प्रारंभ झाला आहे. पंचवटी विभागातील नव्या रचनेनुसार असलेल्या प्रभाग क्र मांक २, ४ व ५ मधून वेगवेगळ्या पक्षाकडून निवडणूक लढविणाऱ्या इच्छुकांचा जणू मेळावा भरला होता. प्रभाग रचना व आरक्षण जाहीर झाल्यानंतर मनोधैर्य वाढल्याने इच्छुक उमेदवारांनी आपापला मित्र परिवार जमा करण्यास सुरुवात केली आहे. पेठरोडवर रंगलेल्या हॉटेलमध्ये भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, मनसे, बसपा या पक्षांसह विद्यमान नगरसेवक, नगरसेवक पती व त्यांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. निवडणुकीच्या निमित्ताने जमलेली ही सर्व मंडळी एकमेकांचे कट्टर मित्र असून, आगामी महापालिका निवडणुकीत कोणी कोणत्या पक्षाकडून उमेदवारी करावी, कोणता प्रभाग सोपा जाईल यावर चर्चा रंगली होती. महापालिका निवडणुकीला आणखी तीन महिन्यांचा कालावधी शिल्लक असला तरी पक्षाकडून उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच ज्या त्या इच्छुकांनी आपापल्या परीने प्रचार यंत्रणा राबविण्यास सुरु वात केली आहे. निवडणुकीत एकमेकांच्या समोर उमेदवारी करायची की नाही, एकाच पक्षाकडून स्पधर्कांची संख्या वाढली तर काय करायचे या चर्चेवर इच्छुकांनी भर दिला. निवडणुकीच्या पूर्वी रंगलेल्या सर्वपक्षीय इच्छुकांच्या या चर्चेत चहापान, भोजनावळ आटोपल्यावर निवडणूक लढविणाऱ्या सर्वच इच्छुक उमेदवारांनी निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय स्पर्धा होत असल्या तरी पक्षविरहित मैत्रीचे संबंध कायम ठेवण्याची खूणगाठ बांधली. इच्छुकांच्या छबी आता मोठमोठ्या होर्डिंग्जवर झळकू लागले आहेत. त्यामुळे प्रभागातील नागरिकांना अनोळखी चेहऱ्याचेही दर्शन घडत आहे. (वार्ताहर)
सर्वपक्षीय इच्छुकांचा भरला मेळा
By admin | Published: October 18, 2016 2:38 AM