देवळाली कॅम्प : लष्कराच्या देशभरातील युनिट््समध्ये विविध पदांची भरती असल्याची जाहिरात व्हॉट््सअॅपवर फिरल्यामुळे देशभरातील हजारो तरुण देवळालीकॅम्प आर्टिलरी सेंटर येथे भरतीसाठी आले होते. कॅम्पमध्ये आल्यानंतर अशाप्रकारची कोणतीही भरती नसल्याचे स्पष्टीकरण लष्काराने दिल्यानंतर आलेले तरुण निराश होऊन परतले. देवळालीतील टीए बटालीयनमध्ये ४४ जागांची भरती प्रक्रि या होणार असल्याचे संदेश सोशल मीडियावर फिरल्यामुळे राज्यभरातून हजारो युवक शुक्रवारी देवळालीत दाखल झाले होते. आर्टिलरी सेंटरमध्ये आल्यानंतर अशी कोणतीही भरती नसल्याची माहिती त्यांना मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. या संदर्भात काही तरुणांशी संवाद साधला असता त्यांनी भरतीची बनावट जाहिरात मोबाइलवर फिरत असल्याचे दाखविले. सोशल मीडियाच्या माध्यमातून वर्षभरात दुसऱ्यांना अशा प्रकारची जाहिरात आल्याने हजारो तरुणांच्या भावनेशी खेळ खेळला जात आहे. या जाहिरातीमध्ये देशभरातील बेळगाव, बेंगळुरू,देहरादून, कोल्हापूर, नागपूर, देवळाली, तामिळनाडू, कानपूर, सिकंदराबाद या ठिकाणी डिसेंबर १७ ते एप्रिल १८ या दरम्यान जी. डी. सोल्जर व क्लार्क या पदांसाठी एकूण ३७९ जागेसाठी भरती होणार असल्याचे दर्शविण्यात आले आहे. देवळालीतील टीए भरतीकरिता १७ ते ३१ मार्च दरम्यान ४४ जागांसाठी राज्यातील सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे, बुलढाणा, बीड, अहमदनगर, औरंगाबाद, नांदेड, परभणी यांसह विविध जिल्ह्यातील हजारो युवक देवळालीत दाखल झाले होते. मात्र धोंडीरोड टीए बटालियनच्या कार्यालयात भरतीची चौकशी केली असता अशी कोणतीही भरती या कार्यालयाकडून केली जात नसल्याचे स्पष्ट करण्यात आले.
लष्कर भरतीच्या बनावट जाहिरातीने तरुणांची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2018 12:58 AM