नाशिक : गॅरेजमध्ये काम करताना दुरुस्तीसाठी येणाऱ्या दुचाकींची माहिती करुन घेत त्यांच्या अस्सल किल्ल्यांची बनावट किल्ली (ड्युप्लिकेट) तयार करुन रात्रीच्या सुमारास ग्राहकांच्या दुचाकी लंपास करणाऱ्या दोघा संशयित चोरट्यांना गुन्हे शाखा युनीट-१च्या पथकाने शिताफीने बेड्या ठोकल्या. त्यांच्या ताब्यातून सहा लाख ४५ हजार रुपये किमतीच्या नऊ दुचाकी हस्तगत करण्यास पोलिसांना यश आले आहे. मोइन अन्वर खान (२४, रा. पखाल रोड) व तौफीक नसीर खान (२४, रा. उत्तर प्रदेश) अशी अटक केलेल्या संशयित दोघा चोरट्यांची नावे आहेत.
शहरात दुचाकी चोरीचे सत्र वाढल्याने शहर पोलिसांनी दुचाकी चोरट्यांचा तपास करण्यावर भर दिला. त्यातच चोरटे मोपेड स्वरुपातील दुचाकींवर अधिकाधिक डल्ला मारत असल्याचे तपासात पुढे आले. त्यामुळे गुन्हे शाखेने त्या दिशेने तपासाचा केंद्रबिंदू निश्चित केला असता पोलीस अंमलदार मुख्तार शेख यांना गोपनीय माहिती मिळाली. दुचाकी चोरटे पंचवटीतील सेवाकुंज येथे येणार असल्याचे त्यांना समजले. शेख यांनी ही माहिती पोलिस निरीक्षक विजय ढमाळ यांना कळविली असता त्यानुसार ढमाळ यांच्या आदेशान्वये पथकाने सापळा रचत दोघा संशयितांना शिताफीने ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी मुंबईनाका परिसरातून दुचाकी चोरल्याची कबुली दिली. दरम्यान, पोलिसांनी खाक्या दाखविताच मोइन व तौफिक यांनी पंचवटी, भद्रकाली, मुंबईनाका परिसरातून तब्बल ११ दुचाकी चोरल्याचे सांगितले. त्यांना पोलिसांनी दुचाकी चोरीची पद्धत विचारली असता त्यांनी सांगितलेली गुन्ह्याची पद्धत ऐकून पोलीसही चक्रावले.
--इन्फो--
दोन दुचाकींची परस्पर भंगारात विक्री
चोरीच्या ९ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. दोघेही संशयित गॅरेजमध्ये काम करत होते. दुरुस्तीसाठी आलेल्या दुचाकीची बनावट किल्ली तयार करुन त्यानंतर या दुचाकी चोरल्याची कबुली त्यांनी दिली. २ ॲक्सेस, ६ ॲक्टिवा, १ बुलेट अशा ६ लाख ४५ हजार रुपयांच्या दुचाकी पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत. तर दोन दुचाकी भंगारात त्यांनी विक्री केल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे.