नाशिक : राज्यात आता लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर अनेक ठिकाणी बांधकामे सुरू असून, बांधकाम कामगार नसलेल्याची बोगस नोंदणी करण्याचे गैरप्रकार घडत आहेत. बोगस नोंदणी करून त्यांना आर्थिक साहाय्य देण्यात आले असून, या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी सिटूच्या वतीने करण्यात आली आहे.महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे बांधकाम क्षेत्रातील कामगारांची बनावट नोंदणी करण्याचा प्रकार घडले आहेत. या प्रकरणाची नोंदणी करून या कामगारांना दहा हजार रुपयांची आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी करण्याचा गैरप्रकारदेखील घडत आहेत. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातर्फे कामगारांना आर्थिक लाभ देण्यात आल्यामुळे योग्य कामगार मात्र लाभापासून वंचित राहत आहेत. विशेष म्हणजे ज्यांनी कुठेही बांधकाम कामगार म्हणून काम केले नाही, तरी सुद्धा त्यांची बोगस नोंदणी करून त्यांना आर्थिक साहाय्य देण्यात आले. या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी सिटूच्या वतीने करण्यात आली आहे. काही अधिकाऱ्यांनी ठेकेदारांकडून अशी बोगस नोंदणी करून घेतली आहे. त्याबाबत चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी डॉ. डी. एल. कराड आणि पदाधिकाऱ्यांनी केली असून, कामगारमंत्री दिलीप वळसे पाटील, राज्यमंत्री बच्चू कडू यांच्यासह महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाकडे याबाबतचे निवेदन पाठविले आहे.