इंदिरानगर : वाहन परवाना काढण्यासाठी गुगलद्वारे एका ‘ड्रायव्हिंग लायसन्स डॉट ऑर्गनायजेशन’ या संकेतस्थळाद्वारे एका व्यक्तीची फसवणूक करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. ड्रायव्हिंग लायसन्स घरपोच ऑनलाइन देण्याचा दावा या संकेतस्थळाकडून करण्यात येऊन पैसे उकळले जात असल्याचा आरोप हर्षल देवधर नावाच्या युवकाने केला आहे.
घरबसल्या लर्निंग लायसन्स देण्याची सुविधा प्रादेशिक परिवहन विभागामार्फत सुरू करण्यात आली आहे. यासाठी भारत सरकारच्या परिवहन सेवेचे अधिकृत संकतेस्थळ उपलब्ध करून देण्यात आले आहे. या संकेतस्थळावर भारताची राजमुद्रा स्पष्टपणे झळकते. मात्र, तरीदेखील बहुतांश युवक गुगलवर केवळ ‘ऑनलाइन ड्रायव्हिंग लायसन्स’ असे शब्द टाकून शोध घेतात आणि त्यामुळे शेकडो संकेतस्थळ गुगलकडून दाखविले जातात आणि त्यामध्ये बहुतांश संकेतस्थळे ही बनावट, केवळ पैसे उकळण्यासाठी असतात, हे नागरिकांनी लक्षात घेणे गरजेचे आहे. संकेतस्थळावर दिलेले बहुतांश मोबाइल क्रमांक (९१)ने सुरू होणारे परराज्यातील असतात. अशाच प्रकारचे एक खासगी संकेतस्थळ ड्रायव्हिंग लायसन्स ऑनलाइन इंडिया नावानेदेखील आहे. या संकेतस्थळावरून लायसन्स काढण्यासाठी आम्ही सर्व मदत करू आणि ऑनलाइन लायसन्स मिळवून देऊ, असा दावा केला गेला आहे. मात्र, या संकेतस्थळांवर सर्व वैयक्तिक माहिती भरल्यानंतर ३७५ रुपयांची मागणी केली जाते. अशा प्रकारे शहरातील इंदिरानगर येथील हर्षल देवधर यांनी या संकेतस्थळावर भेट दिली.
--इन्फो--
‘पेटीएम’द्वारे उकळले ९८० रुपये
१ एप्रिल रोजी प्रथम त्यांच्याकडून ३७५ रुपये घेण्यात आले. त्यानंतर त्यांना संबंधितांनी मोबाईलचा व्हाॅटस्अप नंबर देऊन छायाचित्र पॅन कार्ड आधार कार्ड मागितले आणि पुन्हा ९८० रुपये ऑनलाइन भरण्यास सांगितले. ‘तुम्हाला सात दिवसांत वाहन परवाना रिन्युअल करून मिळेल’ असे सांगितले गेले. संबंधित व मोबाइल नंबरवर संपर्क साधला असता संपर्क झाला नाही, म्हणून नाशिक येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयात देवधर यांनी चौकशी केली असता, असे संकेतस्थळ बनावट असल्याचे सांगितले.