नाशिक - राज्य शासनाच्या आदिवासी विभागाची बनवाट वेबसाईट बनवून अनेकांना गंडा घातल्याचं प्रकरण समोर आलं आहे. यामध्ये सायबर पोलिसांनी एका संशयिताला अटक केली आहे. जितेंद्र रामा तायडे या संशयिताला जळगावहून पोलिसांनी अटक केली. याला २ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
जितेंद्र तायडे हा उच्चशिक्षित तरुण आहे. बी. ई सिव्हिल असं त्याचं शिक्षण झालं आहे. नुकतीच पुणे महापालिकेत त्याला नोकरी मिळाली आहे. मात्र बनावट वेबसाईट्सच्या माध्यमातून त्याने अनेकांची फसवणूक केल्याचं समोर आलं. आतापर्यत २१६ जणांना जितेंद्रने गंडा घातला आहे. पे.यू वॉलेटच्या माध्यमातून त्याने पैसे गोळा केले. ३ हजार पदांसाठी भरती निघाल्याचं सांगण्यात आलं. या गुन्ह्यात पोलिसांचा तपास सुरु आहे. यात जितेंद्रसोबत आणखी काही जण असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.