नाशिक : गंगापुररोडवरील मॅरेथॉन चौकात पंडीत कॉलनीच्या वळणावर असलेले भले मोठे सुमारे २५ ते ३० फुट उंचीचे बुचाचे झाड गुरुवारी (दि.२१) सकाळी अचानकपणे उन्मळून पडले. यावेळी झाडाच्या मोठ्या खोडाखाली रस्त्यावरुन जाणारी दुचाकी दाबली गेली. दुचाकीस्वाराने वेळीच प्रसंगावधान दाखविल्याने तो बालंबाल बचावला.
घटनेची माहिती मिळताच सरकारवाडा पोलीसांसह अग्नीशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली.याबाबत अधिक माहिती अशी, पंडीत कॉलनीच्या वळणावर असलेल्या रिक्षा थांब्यालगत गंगापुररोडवर बुचाचे मोठे झाड होते. सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास अचानकपणे हे झाड उन्मळून खाली कोसळले. यावेळी रस्त्यावरुन दुचाकीने (एम.एच.१५सीबी७७५७) किरण सुरेश देवकर हा युवक मार्गस्थ होत होता. सुदैवाने झाड हळुहळु रस्त्याच्या बाजूला कलत असल्याचे त्याच्या लक्षात आल्याने किरणने त्वरित दुचाकीवरुन बाजूला उडी घेतली. याचवेळी झाड झपकन पुर्णपणे रस्त्यावर कोसळले. सुमारे २५ ते ३० फुट उंचीचा हा भला मोठा वृक्ष कोसळल्याने रावसाहेब थोरात सभागृहाकडे जाणाऱ्या रस्त्यापर्यंत त्याचे खोड पडलेलेले होते. यामुळे अशोकस्तंभ-गंगापुरनाका व गंगापूरनाका ते अशोकस्तंभपर्यंतची वाहतुक दुतर्फा खोळंबली होती. आजुबाजुच्या लोकांनी वेळीच धाव घेत जखमी झालेल्या युवकाला रुग्णालयात उपचारासाठी हलविले. यावेळी युवकाला झाडाचा मार लागला नाही, मात्र त्याने उडी घेतल्याने रस्त्यावर पडल्यामुळे मुका मार लागल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. घटनेची माहिती मिळताच अग्नीशमन दलाच्या पंचवटी उपकेंद्राचे लिडिंग फायरमन विलास डांगळे, अशोक निलमनी, संतोष मेंद्रे, उमेश झिटे, महेंद्र सोनवणे, विजय गायकवाड आदिंनी घटनास्थळी धाव घेतली. पेट्रोल कटरच्या सहाय्याने झाडाचे खोड कापून झाडाखाली अडकलेली दुचाकी जवानांनी बाहेर काढली. तसेच सुमारे दीड तास दोन कटरच्या सहाय्याने या झाडाचे संपुर्ण खोड कापून रस्ता वाहतुकीसाठी खुला करुन दिला. वादळवारा नसतानाही अचानकपणे भला मोठा वृक्ष कसा कोसळला ? याविषयी परिसरात तर्कवितर्क लावले जात होते.