येवला : नोव्हेंबरअखेर नवा कांदा बाजारात येईल आणि साठवण केलेल्या उन्हाळ कांद्याला कवडीमोल भाव मिळेल या धास्तीने येवला कांदा बाजार आवारात उन्हाळ कांद्याची आवक स्थिर असून, बाजारभावात मात्र घसरण सुरूच आहे. यामुळे आताच कांद्याला भाव नाही तर नव्या पोळ लाल कांद्याला भाव कसा मिळणार, असा सवाल कांदा उत्पादक विचारत आहेत.गुरुवारी तीन हजार क्विंटल कांद्याची आवक झाली. केवळ २०० ते ८२० रुपये तर सरासरी ४५० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. यामुळे शेतकरी पुरता निराश झाला असून, आता वाहतूक खर्चदेखील फिटत नसल्याने हवालदिल झाला आहे. उन्हाळ कांदा साठवला तेव्हा १५०० ते २००० रु पये भाव मिळेल, अशी अपेक्षा होती. कांदा बाजारभावाला लागलेली उतरती कळा आणि कांद्याचे ४५० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत भाव आल्याने कांदा उत्पादक चिंतित झाला आहे. गेल्या १५ दिवसापासून दररोज कांद्याच्या भावात सारखा चढउतार चालू आहे. केवळ निसर्गाची कृपा आणि अवकृपा झाली तरच कांद्याला भाव मिळेल, अशी धारणा शेतकऱ्यांची झाली आहे. परतीच्या पावसाने कांद्याचे अतोनात नुकसान झाले असून, चाळीत साठवलेला कांदा सडू लागल्याने व आता भाव नसल्याने उत्पादक विवंचनेत सापडला आहे. (वार्ताहर)
कांदा भावात घसरण सुरूच
By admin | Published: October 15, 2016 1:31 AM