पोलीस बिटांना चौकी असते. त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत एकूण ३५ गावे असून, अंजनेरी, महिरावणी, अंबोली व त्र्यंबकेश्वर टाउन पोलीस चौकी आहे. पण अंबोलीवगळता अंजनेरी व महिरावणी येथे पोलीस चौक्या नाहीत. त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात दुमजली बांधीव पोलीस चौकी आहै. कुशावर्त तीर्थ येथेही बांधीव पोलीस चौकी होती. पण सन २०१५-१६ च्या सिंहस्थात रेडिमेड चौक्या आल्याने ही बांधीव पोलीस चौकी तोडून टाकली आणि आज सिंहस्थ चौकी लावली आहे. तसेच सिंहस्थ काळात निवृत्तिनाथ मंदिर परिसर, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात, महादेवी नाके चौकात व श्रीगजानन महाराज जव्हार फाटा सर्कलजवळ व अंबोली चेक नाका येथे पोलीस चौक्या आहेत. या चौक्या विस्तीर्ण व बसण्यासाठी येथे खुर्ची टेबल आहेत. काही ठिकाणी एका भागात पोलीस कर्मचारी तर दुसऱ्या भागात पालिका कर्मचारी बसतात. येथे शौचालयासाठी व्यवस्था असली तरी पाण्याअभावी वापर करता येत नाही. महिला पोलिसांची तर मोठी गैरसोय होते. विशेष म्हणजे अंबोलीवगळता सर्व चौक्या गावात असल्याने बंदोबस्तासाठी असणारे पोलीस सहसा हेड क्वाॅर्टरमधील असतात. त्र्यंबकेश्वरला पोलीस कर्मचारीवर्ग अपुरा आहे. त्यामुळे त्र्यंबकेश्वर पोलिसांऐवजी त्यांच्या बरोबरीला गृहरक्षक दलाचे जवान तैनात असतात.
त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्याची स्थापना ब्रिटिशकाळात १९१० मध्ये करण्यात आली आहे. त्र्यंबकेश्वर हे शहर तीर्थक्षेत्न असून, येथे कायम भाविकांची वर्दळ असते. तालुक्यात हरसूल व त्र्यंबकेश्वर हे दोनच पोलीस ठाणे असले तरी या काही गावे नाशिक तालुक्यातील आहेत, तर त्र्यंबकेश्वर तालुक्यातील काही गावे वाडीवऱ्हे तर काही गावे घोटी पोलीस ठाणे हद्दीत आहेत. याशिवाय त्र्यंबकेश्वरला कायम गर्दी असल्याने रोजची दैनंदिन कामे पाहता पोलीसबळ कमी पडते. त्र्यंबकेश्वर शहरात नेहमीच्या यात्रा असतात. मंगळवारी बाजाराला गर्दी असते. पण तरीही त्र्यंबकेश्वर मंदिर चौकीवगळता अन्य सर्व चौक्या धूळ खात पडून आहेत.
सदर चौक्या सध्या उपयोगात नसल्याने पाण्याची व स्वच्छतेची तशी गरज न पडल्याने सध्या धूळ खातच पडून आहेत. गावातील कुंभमेळा बंदोबस्तासाठी मागविण्यात आलेल्या चौक्या गर्दी होणाऱ्या संभाव्य ठिकाणी उभारण्यात आल्या आहेत. तेथे अन्य दिवशी उपयोग करण्यासाठी विचार सुरू आहे, त्यासाठी पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध झाल्यावर पाणी स्वच्छतेच्या उपाय योजना करणार आहे.
- शिवचरण के. पांढरे, सहायक पोलीस निरीक्षक, त्र्यंबकेश्वर