नाशिकरोड : लग्नासाठी युवतीने वधू-वर संशोधन केंद्राचे अध्यक्ष यांच्याशी संगनमत केले व खोटी माहिती सादर देऊन लग्न करून फसवणूक केल्याप्रकरणी सासऱ्याने सून व विवाहसंस्थेच्या अध्यक्षाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.जगताप मळा गुलमोहर कॉलनी येथील भाऊसाहेब रामभाऊ भारती यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, मुलगा उमेश याचे लग्न जमवण्यासाठी २०१६ मध्ये प्रयत्न करत होतो. मुलाला उच्चशिक्षित वधू पाहिजे असल्याने शोध घेत असताना पुणे येथील योगायोग दशनाम गोसावी वधू-वर संशोधन केंद्र यांच्याकडील वधू-वरांची २०१३ ते २०१६ ची परिचय स्मरणिका बघितली. त्यामध्ये शीतल उद्धव गिरी रा. कोथरूड पुणे हीच्या बायोडाटामध्ये शिक्षण एम.टेक पीएच.डी. असे दाखविण्यात आले होते. स्मरणिकेतील माहितीनुसार संपर्क साधल्यानंतर योगायोग दशनाम गोसावी वधू-वर केंद्राचे अध्यक्ष बाळासाहेब बबन गोसावी यांच्या घरी १ आॅगस्ट २०१६ ला गेलो. तेथून मुलीला बघण्यास गेलो.लग्न झाल्यानंतर काही दिवसांनी मुलगा उमेश याने पत्नी शीतलला तिच्या नोकरीसाठी शिक्षणाचे पीएच.डी. संदर्भात विचारले असता ती पीएच.डी. झाले नसल्याचे लक्षात आले. शीतल गिरी व बाळासाहेब गोसावी यांनी विवाह संस्थेत खोटी माहिती देऊन फसवणूक केल्याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खोटी माहिती देऊन लग्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2019 12:28 AM