नाशिक : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने घातलेल्या निर्बंधांमुळे गोदाकाठावर येऊन धार्मिक विधी करण्यास कुटुंबियांच्या अधिक संख्येबाबत कठोर निर्बंध होते. मात्र, आता निर्बंध काहीसे शिथिल होऊ लागल्याने धार्मिक विधींसाठी कुटुंबातील महिला आणि पुरुष वर्गदेखील येऊ लागले आहेत.
दक्षिणवाहिनी गोदावरीच्या रामकुंड परिसरात दशक्रिया विधी करण्यासाठी कोरोनापूर्वीच्या काळात राज्यभरातून नागरिक येत होते. मात्र, कोराेनाच्या पहिल्या लाटेपासून दुसऱ्या लाटेच्या बहरापर्यंत कुटुंबियांच्या संख्येबाबत निर्बंध घालण्यात येत होते, तसेच परजिल्ह्यात जाण्यासदेखील बंदी घालण्यात आल्याने नाशिकला येऊन दशक्रिया विधी करणे अन्य जिल्ह्यांतील नागरिकांना शक्य होत नव्हते. मात्र, जूनच्या उत्तरार्धात कोरोनाची लाट ओसरण्यासह निर्बंधदेखील शिथिल होऊ लागल्याने गोदाकाठावर दशक्रिया विधीसाठी येणाऱ्या नागरिकांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. बहुतांश नागरिक कोरोनाबाबतची दक्षता पाळूनच विधींनादेखील उपस्थिती लावत असल्याचे दिसून येत आहे.
इन्फो
गर्दी नकोबाबत दक्षता
कोणत्याही धार्मिक विधींसाठी गर्दी करू नये, याबाबत सर्व गुरुजी त्यांच्याकडे येणाऱ्यांना सूचित करीत आहेत, तसेच कोरोनाबाबतची सर्व ती दक्षता पाळूनच विधी केले जात आहेत. शासन आदेशापर्यंत सर्व प्रकारची दक्षता पाळून विधी करण्याच्या सूचना पुरोहित संघातर्फे सातत्याने देण्यात येत आहेत.
सतीश शुक्ल, अध्यक्ष, गंगा गोदावरी पुरोहित संघ
-----------
फोटो
२०पीएचजेएन ६१