नाशिक : २ आॅगस्ट रोजी गोदावरीसह जिल्ह्यातील नद्या, नाल्यांना आलेल्या पुरामुळे संसारोपयोगी वस्तूंची मोठी हानी झालेल्या जिल्ह्यातील साडेसहा हजारांहून अधिक कुटुंबाना प्रत्येकी वीस किलो मोफत धान्य देण्याचा निर्णय शासनाने घेतला असून, मंगळवारपासून त्याचे वाटपही सुरू झाले आहे. सलग ४८ तासांहून अधिक काळ कोसळलेल्या पावसामुळे २ आॅगस्ट रोजी गंगापूर धरणाच्या पाणी साठ्यात कमालीची वाढ होऊन नद्या, नाल्यांना पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. नाशिक शहरात गोदावरी, नासर्डी, वाघाडी या नाल्याच्या दुतर्फा राहणाऱ्या घरांमध्ये पुराचे पाणी शिरले व त्यातून हजारो कुटुंबावर बेघर होण्याची परिस्थिती उद्भवली, अनेकांचे संसार पुराच्या पाण्यात वाहून गेले, तर पुराच्या तडाख्यामध्ये घरांचीही पडझड होऊन डोक्यावरचे छप्परही हिरावून नेण्यात आले. या शिवाय बाजारपेठेतही पुराचे पाणी शिरल्याने दुकानदारांचे कोट्यवधी रुपयांच्या मालाचे नुकसान झाले. आजवर ज्या ज्यावेळी पुराने वित्तहानी झाल्याच्या घटना घडल्या त्या त्यावेळी शासनाने पूरग्रस्तांना आर्थिक मदतीचा हात दिला, परंतु आॅगस्ट महिन्यात राज्यातील बऱ्याचशा जिल्ह्णांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण होऊन नुकसान झाल्याची घटना घडल्याने नाशिकला अपवाद करू शकण्याबाबत शासन पातळीवर संभ्रम होता. तथापि, प्रशासनाने नुकसानग्रस्तांचे पंचनामे करण्यास सुरुवात केल्याने पूरग्रस्त आशावादी झाले होते. गेल्या आठवड्यात शासनाने पावणे आठ कोटी रुपयांची मदत पूरग्रस्तांना देऊ केली, परंतु त्यातून फक्त अधिकृत घरांच्या पडझडीच्या मोबदल्यात नुकसानभरपाई देण्याचा निर्णय घेतला होता व प्रशासनाने पूरग्रस्तांना मोफत अन्नधान्य, सानुग्रह अनुदान देण्याबाबत सादर केलेली शिफारस फेटाळून लावली होती. त्यामुळे पूरग्रस्तांना वाऱ्यावर सोडून दिल्याची भावना बळावली असतानाच, सोमवारी सायंकाळी शासनाने पूरग्रस्त कुटुंबाला प्रत्येकी वीस किलो धान्य मोफत देण्याचा निर्णय घेतला. त्यात दहा किलो गहू व दहा किलो तांदळाचा समावेश आहे. मात्र सानुग्रह अनुदान देण्यास सरकारने नकार दिला आहे.नाशिक जिल्ह्णात ६३३७ कुटुंबांना पुराचा तडाखा बसला असून, त्यात नाशिक व निफाड तालुक्यातील कुटुंबांची संख्या अधिक आहे. त्यांच्यासाठी ६७३.७० क्व्ािंटल गहू व तितकाच गहू प्राप्त झाला आहे. प्रत्येक कुटुंबाला वीस किलो धान्य मोफत देण्यात येणार असल्याने त्याची सुरुवात मंगळवारपासून करण्यात आली. ज्या ज्या पूरग्रस्तांचे पंचनामे झाले त्यांच्या याद्या संबंधित दुकानदार, तलाठ्यांना देण्यात आल्या असून, पूरग्रस्तांनी आपली ओळख पटवून दिल्यानंतरच धान्य मिळणार आहे.
कुटुंबाला वीस किलो : सानुग्रह अनुदानाला ठेंगा
By admin | Published: August 31, 2016 12:40 AM