नाशिक: नाशिकच्या प्रसिद्ध गायिका गीता माळी मुंबईहून नाशिककडे परतत असताना झालेल्या भीषण अपघातात त्यांचा मृत्यू झाला. अपघातात त्यांचे पती विजय माळी जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. माळी यांच्या मृत्यूनं नाशिकमधील कलाक्षेत्रावर शोककळा पसरली.
गीता माळी गेल्या तीन महिन्यांपासून अमेरिकेत गेल्या होत्या. मुंबई विमानतळावर आल्यानंतर त्यांचे पती विजय माळी यांच्यासोबत त्या नाशिकला कारने येत होत्या. दुपारी तीन वाजेच्या सुमारास त्यांची कार ठाणे जिल्ह्यातील शहापूर परिसरात असलेल्या लाहे फाटानजीक आली असताना श्वानाला वाचविण्याच्या प्रयत्नात रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कंटेनरवर जाऊन धडकली. या घटनेत माळी यांना गंभीर दुखापत झाली होती. तात्काळ त्यांना शहापूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र या घटनेत त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली. तर पती विजय हे जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
२०१७ ऑस्ट्रेलियामधील सिडनी या शहरात वीर सावरकर विश्व साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले होते. यावेळी गायिका गीता माळी यांना गायनासाठी निमंत्रित करण्यात आले होते. गीता माळी यांनी संगीत क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत मजल दरमजल करत त्यांनी नावलौकिक मिळवला होता. त्यांच्या आकस्मित निधनाने कला क्षेत्रात शोककळा पसरली आहे. माळी यांच्या अपघाताची माहिती मिळताच सोशल मीडियात अनेकांनी श्रद्धांजली अर्पण करत माळी यांच्या आठवणी शेअर केल्या आहे.