पंचवटी : नाशिकच्या विभागीय संदर्भ सेवा रु ग्णालयात वातानुकूलित यंत्र (एसी) व्यवस्था बंद पडल्याने रुग्णाला उपचारासाठी दाखल करण्यापूर्वी पंख्याची व्यवस्था करा, अशा सूचना रुग्णालयाकडून रुग्णांच्या नातेवाइकांना देण्यात येऊन मगच सदर रुग्णाला औषधो पचारासाठी दाखल करून घेण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेच्या निषेधार्थ मंगळवारी (दि.२७) राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांच्यासह शिष्टमंडळाने गांधीगिरी करून संदर्भ सेवा रु ग्णालय उपसंचालक डॉ. लोचना घोडके यांना पंखा भेट देऊन निषेध नोंदविला. विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयातील वातानुकूलित यंत्र बंद पडल्याने एका रु ग्णाला आपले प्राण गमवावे लागल्याची घटना नुकतीच घडली आहे. गेल्या काही महिन्यांपासून रुग्णालयातील बंद पडलेली वातानुकूलित यंत्रणा व इतर उपकरणे लवकरात लवकर दुरुस्त करण्यात यावे, अशा मागणीचे निवेदन देण्यात आले. यावेळी अॅड. चिन्मय गाढे, किरण पानकर, अमोल नाईक, मुकेश शेवाळे, रोहित जाधव, विवेक जैन, रोहित सोनवणे, रवि निफाडे आदींसह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
राष्टवादीकडून संदर्भ सेवा रु ग्णालयाला पंखा भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2018 12:29 AM