पंचवटी : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीने आवारातील गाळेधारकांची भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला असून, यासंदर्भात गाळेधारकांशी कुठलीही चर्चा न करता थेट अवास्तव भाडेवाढीच्या नोटिसा गाळेधारकांना पाठविल्याने बाजार समितीने घेतलेल्या निर्णयामुळे गाळेधारकांनी संताप व्यक्त केला आहे. दरवर्षी बाजार समिती फेब्रुवारी महिन्यात गाळेधारकांच्या गाळ्याचे भाडे व परवाना नूतनीकरण करत आलेली आहे, मात्र यावर्षी बाजार समितीने भाडेवाढ करण्याच्या उद्देशाने फेब्रुवारी महिना उलटूनही गाळेधारकाकडून भाडे वसुली केलेली नाही. विशेष म्हणजे परवाना नूतनीकरणासाठी बाजार समितीने याचवर्षी विलंब केल्याने त्यामागे नेमके हेच कारण असल्याचे लपून राहिलेले नाही. यासंदर्भात काही गाळेधारक बाजार समितीकडे भाडे मागण्यासाठी गेले असता बाजार समितीने सध्याच्या भाड्यापेक्षा तब्बल सहापट वाढीव गाळेभाडे भरण्याची तोंडी मागणी करीत आहे. बाजार समिती करत असलेल्या या भाडेवाढीला गाळेधारकांचा विरोध असून, सदरची भाडेवाढ कायद्याला धरून नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. बाजार समितीतील गाळेधारकांना केवळ जाणूनबुजून त्रास देण्याच्या हेतूनेच बाजार समितीने ही वाढ केल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. बाजार समितीने केलेल्या या भाडेवाढीच्या विरोधात व्यापाºयांनी काही संचालकांशी पत्रव्यवहार केला आहे. दरम्यान, या भाडेवाढीच्या निर्णयाबाबत बाजार समितीने तत्काळ निर्णय घेतला नाही तर व्यापाºयांनी लिलाव प्रक्रियेवर बहिष्कार टाकण्याचा पवित्रा घेतला आहे.
गाळेधारकांना भाडेवाढीच्या नोटिसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2018 1:07 AM