नाशिक : गणपतींपाठोपाठ दाखल झालेल्या गौरींचे मंगळवारी (दि. १४) विधिवत विसर्जन करण्यात आले. विशेष म्हणजे पाचव्या दिवसांच्या गणपतींचेदेखील नदीपात्रात विसर्जन करण्यात आले तर परंपरेनुसार गाैरींना गोदास्नान घालून पुन्हा आणण्यात आले. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या सावटाखाली यंदा सार्वजनिक गणेशोत्सवाला मर्यादा असली तरी घरोघरी मात्र श्रींची प्रतिष्ठापना करण्यात आली. यंदा घरगुती गणेशोत्सवावर अधिक भर आहे. प्रथेप्रमाणे गणेश प्रतिष्ठापनेनंतर गौरी आवाहन असलेल्या परंपरा असलेल्या घरांमध्ये त्या प्रतिष्ठापित झाल्या. गणेेश स्थापनेनंतर दोन दिवसांनी महालक्ष्मींची प्रतिष्ठापना करण्यात आली. परंपरेनुसार मुखवटे, खडे, सुगड अशा विविध प्रकारच्या मूर्ती तयार करून त्यांची विधिवत पूजा करण्यात आली.
दुसऱ्या दिवशी नैवेद्य भोजन आणि सायंकाळी हळदी कुंकवाचे कार्यक्रमदेखील पार पडले.
तिसऱ्या दिवशी म्हणजेच मंगळवारी विसर्जन होते. त्यामुळे गेली पाच दिवस घरांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. मंगळवारी सायंकाळी गौरींना पुनरागमनाचे आवाहन करून गौरींचे विसर्जन करण्यात आले तर गणेशमूर्ती नदीपात्रात विसर्जित करण्यात आल्या. नाशिक महापालिकेने यंदाही विसर्जन स्थळी मूर्तिदानाची व्यवस्था केली हेाती. त्यानुसार मूर्ती घेऊन येणाऱ्यांना आवाहन करण्यात आले आणि मूर्तींचे दान घेण्यात आले.
इन्फो...
शाडू मातीच्या मूर्ती विसर्जनाला विरोध
पीअेापीच्या मूर्ती नदीपात्रात विसर्जित करू नये इथपर्यत ठीक परंतु नाशिक महापालिकेने शाडू मातीच्या मूर्ती सक्तीने जमा करण्यास सुरुवात केल्याने अनेक ठिकाणी वादाचे प्रसंग घडले. कायद्याचा भलता अर्थ लावून अकारण भावनिक विषय निर्माण करू नये, असे आवाहन गणेश भक्तांनी केले आहे.
---
गेल्या पाच दिवसांपासून घरोघर विराजमान असलेल्या गणरायाचे आणि गौरींचे विसर्जन करण्यात आले. या निमित्ताने गोदाकाठी गणेशमूर्ती विसर्जित करण्यात आल्याच परंतु गौरींच्या मुखवट्यांना स्नान दाखवून त्या परत नेण्यात आल्या.