नाशिक : महानगरपालिकेच्या वतीने शहरात ठिक ठिकाणी मूर्ती संकलनास प्रारंभ करण्यात आला असून त्यास चांगला प्रतिसाद मिळत आहे. लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी महापालिकेने सहाही विभागांत २७ नैसर्गिक व पारंपरिक ठिकाणी व नदी प्रदूषण टाळ्ण्यासाठी तब्बल ५७ कृत्रिम तलावाची निर्मिती करण्यात आली आहे. रात्री उशिरा मूर्ती संकलन होईपर्यंत हे केंद्र सुरू राहणार असल्याची माहिती घनकचरा विभागाचे संचालक डॉ. आवेश पलोड यांनी दिली.
गणेशमूर्तीचे नदीपात्रात विसर्जन न करता मनपाच्या गणेश विसर्जन स्थळांवर गणेशमूर्ती आणि निर्माल्य संकलित करण्यात येणार आहे. यासाठी मनपाने शहरातील सर्व सहा विभागांत एकूण ८४ नैसर्गिक आणि कृत्रिम विसर्जन स्थळांची निश्चिती केली आहे. महापालिकेच्या वतीने नाशिकरोड, नाशिक पूर्व, पंचवटी, सिडको, नाशिक पश्चिम, सातपूर अशा एकूण ८३ ठिकाणी मूर्ती संकलन केंद्र उभारण्यात आले आहे. यात नैसर्गिक घाट २७ तर ५६ कृत्रिम तलावांची निर्मिती करण्यात आली आहे. विसर्जनाच्या दृष्टीनं सहाही विभागात सार्वजनिक स्वच्छता, मिरवणूक मार्गावर स्वच्छता व औषधोपचाराची व्यवस्था केली.
यासोबतच निर्माल्य कलश, कीटकनाशक फवारणी, विसर्जन घाटांवर अग्निशमन दल, घाटांवर औषध फवारणी करण्यात आली आहे. तसंच ज्या भागात नदी, तलाव, विहिरी नाहीत अशा परिसरात विसर्जन हौद म्हणून लोखंडी टाक्यांची सोय करण्यात आली आहे. शहरातील सर्व नागरिकांना त्यांचे घरगुती आणि सार्वजनिक मंडळांच्या गणेशमूर्तीचे विसर्जन नदीपात्रात न करता मनपाच्या मूर्ती संकलन केंद्रांवर त्यांच्या मूर्ती दान द्याव्यात. तसेच निर्माल्यदेखील संकलन केंद्रांवर जमा करावे. याकरिता महापालिका प्रशासन काम करीत आहेत.
गणेश मूर्ती विसर्जनासाठी गणेश भक्तांना एकूण ८४ नैसर्गिक व कृत्रिम स्थळे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. नागरिकांनी पर्यावरनाच्या दृष्टीने आणि प्रदूषण रोखण्याच्या भावनेने मनपाने उपलब्ध करून दिलेल्या कृत्रिम व नैसर्गिक घाटांवरच गणेश मूर्ती विसर्जनासाठी देण्यात याव्यात. - डॉ. आवेश पलोड, संचालक, घनकचरा विभाग, महापालिका.जास्त मूर्ती संकलन करा, अन् बक्षीस मिळवामहापालिकेच्यावतीने नाशिकरोड, नाशिक पूर्व, पंचवटी, सिडको, नाशिक पश्चिम, सातपूर या सहाही विभागांत मूर्ती व निर्माल्य संकलन केंद्र उभारण्यात आली आहे. सहा विभागांपैकी ज्या केंद्रावर जास्तीत जास्त मूर्ती संकलित केल्या जातील तेथील कर्मचाऱ्यांचा महापालिकेच्यावतीने सत्कार करण्यात येणार आहे, अशी माहिती आयुक्त तथा प्रशासक डॉ. अशोक करंजकर यांनी दिली.