पिंपळगाव बसवंत : द्राक्षमालाचे शिल्लक राहिले पैसे मागण्यासाठी गेलेल्या निफाड तालुक्यातील उंबरखेड येथील शेतकऱ्याला एका व्यापाऱ्याने बेदम मारहाण केल्याची घटना पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. या संदर्भात संबंधित संशयितावर पिंपळगाव पोलीस ठाण्यात मारहाणीचा गुन्हा सोमवार, दि. २१ रोजी दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, निफाड तालुक्यातील द्राक्ष उत्पादक शेतकरी सतीश भिकाजी निरगुडे (४२, राहा. उंबरखेड, सोमेश्वर मळा) हे आपल्या द्राक्ष मालाचे शिल्लक राहिलेले पैसे संशयित पप्पूलाल गुप्ता यांच्याकडे रविवार, दि. २० रोजी घ्यायला गेले असता पैसे आज देतो उद्या देतो, असे म्हणून टाळाटाळ केल्याने आरोपी पप्पूलाल गुप्ता याने शिवीगाळ, दमदाटी करून फिर्यादीच्या छातीत बुक्कीने मारहाण केली व आणि आरोपीचा मुलगा गौरव पप्पूलाल गुप्ता याने फरशी पुसण्याचे वायफरच्या लोखंडी पाइपने फिर्यादीचे नाकावर मारून दुखापत केली म्हणून पिंपळगाव पोलीस ठाण्यात संबंधित दोन्हीही संशयितांवर मारहाणीचा गुन्हा दाखल केला. या घटनेमुळे शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे. अधिक तपास पिंपळगावचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पठारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार रामदास गांगुर्डे करत आहेत.
-----------
शेतकऱ्यांची देणी न देता त्यांना मारहाण करणे चुकीचे आहे. संबंधित व्यापाऱ्यावर गुन्हा दाखल करून त्यांचे शेतमाल खरेदी करण्याचे परवाने रद्द करावे आहे आणि त्यांना कडक शासन व्हावे म्हणजे भविष्यात पुन्हा अशी घटना घडणार नाही. अन्यथा संबंधित व्यापाऱ्याविरोधात जनआंदोलन छेडण्यात येईल.
- अमोल जाधव, सरपंच, मुखेड
............