सटाणा : सततच्या नापिकीला कंटाळून तालुक्यातील तळवाडे भामेर येथे अल्पभूधारक शेतकऱ्याने कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी (दि. १६) सकाळी उघडकीस आली.
मनोहर पोपट गायकवाड यांनी खरीप पीक व पावसाळी कांदा लागवडीसाठी हातउसनवारीचे पैसे घेतलेले होते. मात्र अवकाळी पावसामुळे होत्याचे नव्हते झाले. हातातले पीक गेल्यामुळे त्यांच्या आर्थिक नाड्या बंद झाल्या. उसनवार पैसे घेतलेल्या लोकांचा तगादा सुरु झाल्याने त्या विवंचनेत बुधवारी (दि.१५) दुपारी आपल्या राहत्या घरात गायकवाड यांनी कीटकनाशक प्राशन केले. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर नातेवाइकांनी तत्काळ नामपूर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र उपचारापूर्वी गायकवाड यांचे निधन झाले. याप्रकरणी जायखेडा पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.