दिंडोरी : तालुक्यातील मातेरेवाडी येथे जाधव वस्तीवर राहणाऱ्या देवीदास शरद जाधव (५३) या शेतकऱ्यावर बिबट्याने शनिवारी (दि.९) पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास हल्ला करत गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे.याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, देवीदास जाधव हे आई, पत्नी, भाऊ आणि मुलांसह शेतातील वस्तीवर राहतात. शेताला पाणी भरण्यासाठी देवीदास जाधव हे शनिवारी पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास विहिरीवरील वीजपंप सुरू करण्यासाठी गेले असता विहिरीजवळ दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक त्यांच्यावर हल्ला करत गंभीर जखमी केले. यावेळी देवीदास यांनी बिबट्याशी झुंज करत बिबट्याला परतवून लावले. जखमी अवस्थेत त्यांना येथील नागरिकांनी नाशिक येथे खासगी रु ग्णालयात दाखल केले. मफलर असल्यामुळे त्यांच्या जिवावरचे संकट टळले. या अगोदर दहा दिवसांपूर्वीच मातेरेवाडी परिसरातील खराटे मळा येथे एका बिबट्याला येथील नागरिकांनी पकडून वनविभागाच्या ताब्यात दिले होते.अजूनही या परिसरात बिबट्या असल्याची वनविभागाला माहिती देण्यात आली होती. वनविभागाने या मागणीकडे दुर्लक्ष केले असल्याचे येथील नागरिकांनी सांगितले. दरम्यान, वनविभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला.
मातेरेवाडी येथे बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2019 1:07 AM