नाशिक : द्राक्षबागा व नगदी पिकांना उद्ध्वस्त करून नागपूरहून येणाऱ्या वीजवाहिनीचा मार्ग बदलण्यासाठी शेतकरी आग्रही असून, पॉवर ग्रीड कार्पोरेशनने तटस्थ यंत्रणेमार्फत केलेले सर्वेक्षण ग्रा' धरून वाहिनीचा मार्ग बदलण्यात यावा व शेतकऱ्यांचे नुकसान टाळावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केल्याने यासंदर्भात चर्चा करण्यासाठी शनिवारी जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक बोलावण्यात आली आहे. नाशिक जिल्'ातील पाच ते सहा तालुक्यांमधून जाणाऱ्या उच्चदाब वाहिनीचे टॉवर उभारताना शेकडो द्राक्षबागा उद्ध्वस्त होणार असल्याने चार महिन्यांपूर्वी शेतकऱ्यांनी काम बंद पाडले होते. त्यावर तोडगा काढण्यासाठी मध्यंतरी बैठक घेण्यात येऊन तटस्थ यंत्रणेमार्फत वीजवाहिनीच्या मार्गाचे सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेण्यात आला. सदर संस्थेचा अहवाल जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला असून, त्यात त्यांनी शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी नवीन मार्ग निवडल्यास ८१ किलोमीटरचे अंतर वाढणार आहे. जुन्या मार्गाचा विचार करता, फक्त २६ किलोमीटर अंतर नव्याने वाढणार आहे. यात दोनशे शेतकऱ्यांऐवजी फक्त १५ शेतकऱ्यांच्याच द्राक्षबागा बाधित होतील. त्यामुळे वीजवाहिनीचा मार्ग बदलण्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाने स्वीकारून शेतकऱ्यांचे नुकसान टाळावे, अशी मागणी शुक्रवारी काही शेतकऱ्यांनी केली. यासंदर्भात अपर जिल्हाधिकारी भानुदास पालवे यांची भेट घेऊन शेतकऱ्यांनी निवेदन दिले. नवीन सर्वेक्षणानुसार नवीन मार्गानेच वीजवाहिनीचे काम केले जावे, अशी मागणी केली. त्यावर पॉवर ग्रीड कार्पोरेशनच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे जाणून घेण्यासाठी शनिवारी बैठक घेण्याचे ठरविण्यात आले.
वीजवाहिनी मार्ग बदलावर शेतकरी आग्रही
By admin | Published: December 06, 2014 12:56 AM