नाशिक : ऋषी आणि कृषी हे समानअर्थी शब्द आहेत. शेतकरी हे आधुनिक काळातील ऋषी आहेत. जो शेती करतो तो ऋषी, तो निसर्गपुत्र आहे. ‘अन्न हे परब्रह्म’ असे म्हटले जाते. त्यामुळे अन्न निर्माण करणारा तो खरा ब्राह्मण आहे. शेतीतून मोती पिकवण्याची ताकद त्याच्यात आहे, असे प्रतिपादन गुरुमाउली अण्णासाहेब मोरे यांनी केले. बुधवारी (दि. २५) डोंगरे वसतिगृहावर सुरू झालेल्या जागतिक कृषी महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, कृषिविद्येचे जनक गौतम ऋषी आहेत. मानवजातीच्या अन्न, वस्त्र, निवारा या प्रमुख गरजांची पूर्तता करण्याचे मार्ग याच ऋषींनी मानवाला अवगत करून दिले. भाताचे पीक कसे घ्यायचे याचा शोध त्यांनीच लावला. शेतीतील ज्ञानाद्वारे त्यांनी आपले नाव भूतलावर सिद्ध केले आहे. आधुनिक काळातील शेतीचे होत चाललेले तुकडे क्लेशदायक असल्याचे त्यांनी सांगितले. यातून भविष्यकाळ धोक्यात आला आहे. रासायनिक शेतीने मानवी आरोग्य धोक्यात आले असून, शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीचा कास धरावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. मध्य प्रदेश येथील कृषी अभ्यासक आकाश चौरासिया यांनी सांगितले की, जैविक शेती ही काळाची गरज आहे. प्रकृतीची व्यवस्था म्हणजे जैविक शेती होय. ही जैविक शेतीच मानवाला तारू शकते. त्यामुळे तिचे तंत्र जाणून घेऊन शेतीला प्राधान्य द्यावे, असा आग्रहही त्यांनी व्यक्त केला. व्यासपीठावर सेंद्रिय शेतीतज्ज्ञ सुभाष शर्मा, जिल्हा परिषदेच्या बांधकाम सभापती मनीषा पवार, आमदार सीमा हिरे, माजी जिल्हाधिकारी आर. एस. राठोड, आत्माचे आकाश साबळे, संपत तिडके, शोभा तिडके, कोंडाजीमामा आव्हाड आदी मान्यवर उपस्थित होते. कृषिदिंडीने महोत्सवास प्रारंभ झाला. परिसरातून सवाद्य दिंडी काढण्यात आली. मार्गावर आकर्षक रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. दिंडीच्या समारोपानंतर कार्यक्रमस्थळी दीपप्रज्वलन व मृतिका (माती) पूजन करण्यात आले. आधुनिक शेतीतील भवितव्यावर प्रकाश टाकणारी भाषणे यावेळी करण्यात आली. नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुकुंद कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.सेंद्रिय शेती सोपी असली तरी त्याचे मार्केट शोधणे जिकिरीचे आहे. सेंद्रिय शेतीत पारंपरिक बियाणे महत्त्वाचे ठरतात. त्यांची साठवणूक करणे गरजेचे आहे. याचबरोबर शेती करताना नैसर्गिक संसाधनांचा वापर जास्तीत जास्त प्रमाणात करण्यावर भर द्यावा. - वासुदेव काठे, द्राक्षशेतीतज्ज्ञ१६ मे हा जागतिक कृषी दिन म्हणून साजरा केला जातो. त्या पार्श्वभूमीवर शासनाकडून कृषी पर्यटन धोरण जाहीर करण्यात येणार आहे. फक्त शेती हे उत्पादन न राहता उत्पादनाचे निरनिराळे स्रोत शोधून त्यातून शेतकºयांना मल्टिटास्किंग स्कील दिले जाणार आहे. नैसर्गिक आपत्ती आल्या तरी शेतकरी तग धरू शकेल यावर भर दिला जाईल. परदेशाप्रमाणे भारतातही कृषी पर्यटन धोरण राबवून त्याद्वारे शेतकºयांना रोजगार उपलब्ध करून दिला जाणार आहे. - आशुतोष राठोड, पर्यटन विभाग
शेतकरी हे आधुनिक काळातले ऋषी : अण्णासाहेब मोरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2018 1:15 AM