- संजय दुनबळेनाशिक : हौसेला मोल नसते असे म्हणतात अन् त्यात हौशी शेतकरी असेल तर विचारायलाच नको. पाच एका शेतकरी वधुपित्याने आपल्या लाडक्या कन्येच्या लग्नात नवरदेवाला आणण्यासाठी हेलिकाॅप्टर पाठवले. नवरदेवाच्या घरापासून विवाहस्थळ अवघे पाच कि. मी. असताना हौसेसाठी हेलिकाॅप्टरला मात्र दहा किमीचा फेरा मारावा लागला. यामुळे शेतकऱ्याचा नादच खुळा याचीच सर्वत्र चर्चा ऐकायला मिळत आहे.
ढकांबे येथील प्रगतिशील शेतकरी गोपीनाथ बोडके यांची एकुलती एक उच्चशिक्षित कन्या वैष्णवी हिचा विवाह पिंपळगाव बहुला येथील शांताराम नागरे यांचा उच्चशिक्षित एकुलता एक मुलगा संकेत यांच्यासोबत नुकताच झाला. पिंपळगाव बहुलापासून बालाजी लॉन्स हे विवाहस्थळ अवघे पाच-सात किलोमीटरवर आहे. मोटारीने आले तर दहा मिनिटेही लागणार नाहीत. परंतु,एवढ्या अंतरासाठी सासऱ्यांनी जावयासाठी चक्क हेलिकॉप्टरच पाठवले.
पिंपळगावपासून पाच कि.मी वरील हेलिपॅडवरून हे हेलिकॉप्टर नवरदेवाला घेऊन विवाहस्थळापासू काही अंतरावर लॅँड झाले. तेथून नवरदेवाला गाडीने विवाहस्थळी आणण्यात आले. पिंपळगाव बहुला ते विवाहस्थळ या अंतरापेक्षा किती तरी जास्त हे अंतर आहे. याचीच चर्चा सर्वत्र होती.
प्रत्येक मुलीच्या वडिलांची इच्छा असते आपल्या मुलीचे लग्न थाटात व्हावे. माझीसुद्धा अशीच इच्छा होती. त्यामुळे लाडक्या कन्येचे लग्न काही तरी वेगळ्या स्वरूपात करायचे ठरवले आणि करून दाखवले.- गोपीनाथ बोडके, मुलीचे वडील
सासऱ्यांनी जे केले त्याचे वर्णन करायला माझ्याकडे शब्द नाहीत. मला ऐनवेळी सांगण्यात आले की, तुम्हाला हेलिकॉप्टरने यायचे आहे. त्यामुळे सर्वांना आश्चर्याचा सुखद धक्का बसला. - संकेत नागरे, नवरदेव