आडगाव : आडगाव गावठाण व मळे परिसरामध्ये सुरू असलेल्या १२ तास भारनियमनामुळे नागरिक त्रस्त झाले असून, सणासुदीच्या काळात व परीक्षा सुरू असताना सुरू असलेले भारनियमन बंद करावे, अशी मागणी होऊ लागली आहे. आडगाव परिसरात घरगुती आणि शेतीपंपाची जोडणी एकाच फीडर युनिटवर असून, शेतकऱ्यांचे वीजबिल थकलेले असल्यामुळे सुरू असलेल्या भारनियमनचा फटका घरगुतीचे नियमितपणे बिल भरणाºया ग्राहकांना बसत आहे. वीजपंपाचे व घरगुती वीज कनेक्शन वेगळे करण्यात यावे, अशी मागणी होत असून, नाशिक शहराची वाटचाल स्मार्ट सिटीच्या दृष्टीने होत असताना महानगरपालिका हद्दीतील आडगावात महावितरणच्या वतीने भारनियमन सुरू आहे. सोमवार ते बुधवार सकाळी ७ ते ४ व सायंकाळी ७ ते रात्री १२ व गुरुवार ते रविवार सकाळी ५ ते २ व सायंकाळी ६.३० ते ११.३० भारनियमन सुरू आहे. यंदा पावसाचे प्रमाण कमी असल्याने शेतकºयांचे हाल सुरू असून, पिकांनी पाणी देण्यासाठी लाईट नसल्याने हाल होत आहे. रात्री भारनियमन होत असल्याने परिसरातील अंधाराचा फायदा घेऊन चोºया, घरफोड्या होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दिवाळी सण तोंडावर असल्याने विद्यार्थ्यांच्या सहामाही परीक्षा सध्या सुरू आहेत. सायंकाळी व रात्रीच लाईट नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे अभ्यासासाठी हाल होत असल्यामुळे त्वरित भारनियमन बंद करण्यात यावे, अशी मागणी आडगाव परिसरातील नागरिकांनी केली आहे.
आडगावला खंडित वीजपुरवठ्याने शेतकरी त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2018 12:08 AM