दिंडोरी : तालुक्यातील बोपेगाव येथील शेतकऱ्याने वयाच्या पस्तीशीत आत्महत्या केल्यामुळे वैधव्य आलेल्या त्याच्या पत्नीने खचून न जाता मोलमजुरी करत आपल्या दोन लेकरांना लहानाचे मोठे करून त्यापैकी एकाला लष्करात भरती करून पतीचे लष्करात जाण्याचे स्वप्न पूर्ण केले.बोपेगाव हे चारहजार लोकवस्तीचे छोटेसे खेडेगाव. पण या गावातील तब्बल डझनभर युवक आज देशाच्या सीमेवर देशसेवा करत आहेत. त्यात आज गावातील आत्महत्याग्रस्त कुटुंबातील आशिष अनिल कावळे या युवकाची सैन्य दलात निवड झाल्यामुळे आणखी एक जवानाची भर पडली आहे. त्यामुळे कधीकाळी जिल्ह्याच्या राजकारणाचे केंद्रबिंदू मानले जाणारे गाव आता लष्करी जवानांचे गाव म्हणून परिसरात ओळखले जाऊ लागले आहे.गावातील अल्पभूधारक शेतकरी अनिल दिनकर कावळे या युवकाने ९ वर्षांपुर्वी ऐन दिवाळीत आत्महत्या करून जीवनयात्रा संपवली. वयाच्या तिशीत विधवा झाल्यामुळे संसार उध्वस्थ झालेल्या मीना अनिल कावळे या मातेने खचून न जाता मोलमजुरी करत अवघ्या ११ वर्षाचा आशिष व त्याच्यापेक्षा २ वर्षांनी लहान असलेला मनीष या दोन पितृछत्र हरपलेल्या लेकरांचे पालनपोषण करून मोठ्या मुलाचे १२ वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर वडीलांचे लष्करात भरती होऊन देशसेवा करण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुलाला सैन्यात भरती होण्यासाठी प्रोत्साहन दिले. त्यानंतर सलग २ वर्ष मेहनत घेऊन आशिषने सैन्यात भरती होऊन आपल्या वडीलांचे स्वप्न पूर्ण करत आशिष लवकरच लष्करी प्रशिक्षण घेण्यासाठी रवाना होणार असून त्यानंतर तो देशसेवेसाठी सज्ज होणार आहे. पण आपल्या मुलाची सैन्य दलात निवड झाली ही बातमी समजल्यानंतर त्याच्या आईला आपल्या मुलाच्या अभिमान वाटत असून तिने आनंद व्यक्त केला आहे. लहानपणापासून लष्करी सेवेत जाण्याचे स्वप्न पूर्ण झाल्यामुळे त्याच्या बालपणीच्या मित्रांनाही आनंद व्यक्त केला आहे.लहानपणी पाचवीच्या वर्गात असताना वडीलांनी आत्महत्या केली काही कळण्याचे वय नव्हते, पण वडील गमावल्याची जाणीव झाली होती. अवघा एक बिघा जमिनीवर उपजीविका होणे शक्य नसल्यामुळे आईने मोलमजुरी करून आम्हा दोन्ही भावंडांना मोठे केले. आज तिने सतत जाणीव करून दिलेलं वडीलांचं सैन्यात जाण्याचं स्वप्न पूर्ण झाल्याचा आनंद खूप मोठा आहे.आशिष अनिल कावळे.वयाच्या तिशीत पतींनी आत्महत्या केल्यामुळे सगळं संपलं होत पण खचून न जाता मोलमजुरी करुन दोन लहान लेकरांना भविष्याचा आधार म्हणून पाहिलं, त्यांना वाढवलं. गेली दोन वर्षे माझा आशिष सैन्यात भरती होण्यासाठी दिवसरात्र मेहनत घेत होता. प्रचंड जिद्द आणि परिश्रमाच्या बळावर त्याने आज वडीलांचे स्वप्न पूर्ण केले याचा आनंद तर आहेच, पण माझा मुलगा देशसेवेसाठी सैन्यात दाखल झाला याचा खूप अभिमान वाटतोय.श्रीमती मीना अनिल कावळे. (फोटो २५ आशिष कावळे)
शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील युवक सैन्यदलात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2019 4:17 PM
दिंडोरी : तालुक्यातील बोपेगाव येथील शेतकऱ्याने वयाच्या पस्तीशीत आत्महत्या केल्यामुळे वैधव्य आलेल्या त्याच्या पत्नीने खचून न जाता मोलमजुरी करत आपल्या दोन लेकरांना लहानाचे मोठे करून त्यापैकी एकाला लष्करात भरती करून पतीचे लष्करात जाण्याचे स्वप्न पूर्ण केले.
ठळक मुद्देदिंडोरी : नवऱ्याचे अपुरे स्वप्न मुलांना मोठे करुन केले पुर्ण