नाशिक : जिल्ह्यातील औरंगपूर(ता.निफाड) येथील कर्जबाजारी द्राक्ष उत्पादक शेतकरी भाऊसाहेब शिवाजी खालकर (४४)यांनी राहत्या घरासमोर असलेल्या कडू निंबाच्या झाडाला गुरु वारी (दि.७) पहाटे चार वाजेच्या सुमारास गळफास घेऊन आपले जीवन संपविले.पोलीस पंचनामा दरम्यान त्यांच्या खिशात आढळून आलेल्या चिठ्ठीत देना बँक, सरस्वती बँकेची कर्ज वसुलीची नोटीस आढळून आल्याने कर्जबाजारीपणाला कंटाळूनच त्यांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. भाऊसाहेब खालकर यांनी दोन एकर क्षेत्रावर थॉमसन जातीच्या द्राक्षबागेची लागवड केली होती. चार वर्षांपूर्वी लावलेल्या द्राक्ष बागेने सलग दोन वर्षे नैसर्गिक आपत्ती तर यंदा बाग चांगला येऊनही कवडीमोल भाव मिळाला. त्यांच्यावर सुमारे अकरा लाख रु पयांचे कर्ज होते, असे सांगितले जाते. त्यांच्या पश्चात वृद्ध आई वडील, पत्नी, मुलगा, विवाहित मुलगी असा परिवार आहे.