सिन्नर : तालुक्यातील वडगावपिंगळा येथील वृध्द शेतक-याने शेततळयात उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवार (दि.१९) रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. राष्ट्रीयकृत बँक, सोसायटीचे कर्ज आणि दुर्धर आजाराला कंटाळून या शेतक-याने आत्महत्या केल्याची चर्चा आहे.किसन भागुजी हुळहुळे (६९) असे मृत शेतक-याचे नाव आहे. याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, वडगावपिंगळा येथे किसन हुळहुळे वास्तव्यास असून शेती व्यवसायातून कुटूंबाचा उदरनिर्वाह करतात. हुळहुळे यांच्या घरापासून १ हजार फूट अंतरावर शेततळे आहे. काल दुपारी एक वाजेच्या सुमारास या तळ्याच्या काठावर त्यांच्या डोक्यातील टोपी आढळून आल्याने नातलगांना संशय बळावला. त्यांनी शेतळयाची पाहणी केली असता नितळ पाण्यात किसन हुळहुळे यांचा मृतदेह दिसून आला. दरम्यान पोलिस पाटील सागर मुठाळ यांनी याबाबत सिन्नर पोलिसांना घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. स्थानिकांच्या मदतीने मृतदेह शेततळयातून बाहेर काढण्यात आला. सिन्नर नगरपालिका रूग्णालयात शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. संध्याकाळी शोकाकूल वातावरणात गावात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रकरणी सिन्नर पोलिस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान गेल्या वर्षभरापासून हुळहुळे अर्धांगवायूने ग्रस्त होते. त्यांच्यावर गावातील विकास सोसायटीचे आणि पळसे येथील एका राष्ट्रीयकृत बँकेचे कर्ज असून त्यास कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याची चर्चा आहे. याबाबत सिन्नर पोलिसात घटनेची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार आर. एस. जाधव, बाबा पगारे हे करीत आहेत. हुळहुळे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सूना, नातवंडे, मुलगी असा परिवार आहे.
वडगावपिंगळा येथील शेतक-याची शेततळ्यात आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2019 4:58 PM
किसन भागुजी हुळहुळे (६९) असे मृत शेतक-याचे नाव आहे
ठळक मुद्देगावातील विकास सोसायटीचे आणि पळसे येथील एका राष्ट्रीयकृत बँकेचे कर्ज असून त्यास कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याची चर्चा आहे