लोहोणेर : ग्रामीण भागात स्पर्धा परिक्षांसाठी आवश्यक त्या सोयी-सुविधा उपलब्ध नसतानाही देवळा तालुक्यातील खुंटेवाडी येथील रावण दौलत पगार या शेतकऱ्याची लेक योगिता पगार हिची नुकतीच पहिल्याच प्रयत्नात पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाली आहे. स्वत:वरील विश्वास,अपार कष्टाची तयारी आणि आई-वडिलांची साथ यामुळेच आपण या यशापर्यंत पोहचू शकल्याची भावना योगिता व्यक्त करते.पोलीस उपनिरीक्षक पदासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत ६५० पदांसाठी जून २०१७ मध्ये पूर्व परीक्षा आत्रण ४ नोव्हेंबर २०१७ रोजी मुख्य परीक्षा घेण्यात आली होती. त्यानंतर २६ नाव्हेंबर २०१८ रोजी शारिरीक चाचणी परीक्षा झाली. या स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर झाला. त्यात महिला खुल्या पदासाठी ११० जागा होत्या. त्यात योगिताने २३ वा क्र मांक प्राप्त केला आहे. योगिताने पहिल्याच प्रयत्नात पोलीस उपनिरीक्षक पदाला गवसणी घातली आहे. स्पर्धा परीक्षांत यशस्वी होणे ग्रामीण भागातील मुलांना शक्यच नाही, त्यासाठी इयत्ता पाचवीपासून अभ्यास करावा लागतो, असे कितीतरी गैरसमज आणि न्यूनगंड ग्रामीण मुलांमध्ये आहेत. त्यातली परिस्थिती हा देखील एक भाग आहे. परंतु या सगळ्या गोष्टी तकलादू असल्याचे योगीताने आपल्या यशातून सिध्द करून दाखवले आहे. योगिताने दहावीपर्यंतचे शिक्षण जनता विद्यालय पिंपळगाव (वा) येथे रोज ४ किलोमीटर अंतर चालत येवून पूर्ण केले.देवळा येथील कर्मवीर रामरावजी आहेर महाविद्यालयात योगिताने बीएस्सीचे शिक्षण घेतले. त्यानंतर तिने आपला मोर्चा स्पर्धा परीक्षेकडे वळवला. शाळेत असताना योगिताने मैदानी स्पर्धामध्ये आपली चुणूक दाखवली होती. मुळात योगिताला वाचनाची प्रचंड आवड होती. अभ्यास करताना तिला या वाचनाच्या आवडीचा प्रचंड फायदा झाला. कोणत्याही खासगी क्लासची तिला गरजच भासली नाही. या परीक्षेतील यशानंतर आता तिला राज्यसेवा परीक्षेचे वेध लागले आहेत.’अशक्य काहीच नाहीस्वत:ची स्वप्ने ओळखून प्रामाणिक कष्टाची तयारी ठेवल्यास अशक्य काहीच नाही. सगळ्याच गोष्टींची सगळी माहीती कुणालाच नसते. ऐकलेल्या माहीतीवर न्यूनगंड करु न घेवून ग्रामीण मुलांनी स्वत:चे नुकसान करु न घेवू नये.- योगिता पगार, खुंटेवाडी
शेतकऱ्याची लेक झाली पहिल्याच प्रयत्नात फौजदार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 09, 2019 4:48 PM
प्रेरणादायी : प्रतिकूल स्थितीत घातली यशाला गवसणी
ठळक मुद्देयोगिताने दहावीपर्यंतचे शिक्षण जनता विद्यालय पिंपळगाव (वा) येथे रोज ४ किलोमीटर अंतर चालत येवून पूर्ण केले.