वृषाली शांताराम गडाख यांनी देवपूर येथील शेतात २०१५ साली एक एकर डाळिंबाचे पीक घेतले होते. या पिकाचा त्यांनी सोमठाणा येथील मध्यस्थी सागर शिवाजी धोक्रट आणि नवनाथ रामदास धोक्रट यांच्यामार्फत चांदवड येथील डाळिंबाचे व्यापारी इरफान सुलतान बागवान (रा. बागवान गल्ली, जुनावाडा चांदवड) यांच्याशी व्यवहार केला. २ लाख ५ हजार रुपयांना हा एकूण व्यवहार ठरल्यानंतर व्यापारी बागवान यांनी शेतकरी महिला वृषाली गडाख यांना बेणेपोटी ५ हजार रुपयांची रक्कम रोख दिली. उर्वरित रक्कम डाळिंबाची विक्री केल्यानंतर देण्याचे आश्वासन दिले. मात्र सहा वर्ष उलटूनही संबंधित व्यापाऱ्याने सदर महिला शेतकऱ्यास पैसे अदा केले नाहीत. विशेष म्हणजे या व्यवहारात मध्यस्थी असलेले धोक्रट यांनीही व्यापारी बागवान यांच्याकडे वारंवार पैशासाठी तगादा लावला. मात्र संबंधित व्यापाऱ्याने पैसे देण्यास नकार दिल्याने वृषाली गडाख यांनी मुसळगाव एमआयडीसी पोलिसात संबंधित व्यापाऱ्याने आपली फसवणूक केल्याची फिर्याद दिली आहे. या संदर्भात अधिक तपास पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कराड करीत आहे.
डाळिंब व्यापाऱ्यांकडून शेतकरी महिलेची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 4:14 AM