उमराणे : येथील स्व. निवृत्ती काका देवरे कृषी उत्पन्न बाजार समितीत नवीन लाल (पावसाळी) कांद्याच्या आवकेत प्रचंड वाढ झाली असून सर्वोच्च बाजारभाव ५,३५१ रुपये मिळाला, तर दुसरीकडे भाववाढीच्या अपेक्षेने राखून ठेवलेल्या उन्हाळी कांद्याचे दर निम्म्याने घसरल्याने कांदा साठवणूकदार शेतकरी व व्यापाऱ्यांचा भ्रमनिरास झाला आहे.
गेल्या आठवड्यात मजूर टंचाईमुळे माल बाहेर पडत नव्हता. तसेच शुक्रवार, शनिवार व रविवारी सलग सुट्टी होती. याकाळात शेतकऱ्यांनी काढणीला आलेला लाल कांदा माल विक्रीसाठी तयार करुन ठेवला होता. परिणामी सोमवारी ( दि. २९ ) कांदा लिलाव पूर्ववत होताच बाजार आवारात कांदा विक्रीसाठी शेतकऱ्यांनी एकच गर्दी केल्याने आवकेत प्रचंड वाढ झाली होती. तर, दुसरीकडे अजून काही दिवस लाल कांद्यांची आवक कमी राहील व उन्हाळी कांद्यांचे दर वाढतील या अपेक्षेपोटी चाळींमध्ये साठवणूक केलेला उन्हाळी कांदा लावून धरला होता. मात्र मागील आठवड्यापासून लाल कांद्यांची आवक वाढण्यास सुरूवात होऊन त्यास मागणीही वाढल्याने उन्हाळी कांद्यांचे बाजारभाव वाढणे तर दूरच परंतु होते त्या बाजारभावातही घसरण होऊन निम्म्यावर आले आहेत. या कांद्याचे बाजारभाव अजून कमी होतील की काय या भीतीपोटी उन्हाळी कांदा विक्रेत्यांनीही कांदा विक्रीसाठी गर्दी केली होती. परिणामी आवक वाढल्याने उन्हाळी कांद्याच्या दरात कमालीची घसरण दिसून आली. त्यामुळे कांदा साठवणूकदार शेतकऱ्यांसह खरेदीदार व्यापाऱ्यांचा भ्रमनिरास झाला आहे.
व्यापारी आशावादी
चालूवर्षी नवीन लाल कांदा लागवडीसाठी टाकलेली रोपे खराब झाल्याने नव्याने रोपे टाकण्याची वेळ आली होती. याचा कांदा लागवडीवर विपरित परिणाम होऊन तब्बल दीड ते दोन महिने बाजारात विक्रीस येण्यास उशीर झाला आहे. त्यातच मध्यंतरीच्या काळात लागवड झालेल्या कांदा पिकावर विविध रोगांनी थैमान घातल्याने लाल कांदा उत्पादनात मोठी घट आली आहे. मागणी व पुरवठा याचे व्यस्त प्रमाण झाल्याने नवीन लाल कांद्याला चांगला बाजारभाव मिळत असल्याचे कांदा खरेदीदार व्यापाऱ्यांनी सांगितले आहे.
लाल कांद्याची १२ हजार क्विंटल आवक
बाजार समितीत लाल कांद्यांची पाचशे ते सहाशे वाहनांमधून सुमारे १२ हजार क्विंटल आवक झाल्याचा अंदाज असून बाजारभाव कमीत कमी ७०० रुपये, जास्तीत जास्त ५,३५१ रुपये तर, सरासरी ३८०० रुपयांपर्यंत होता. तसेच उन्हाळी कांद्यांची सहाशे वाहनांमधून १३ हजार क्विंटल आवक झाल्याचा अंदाज असून बाजारभाव कमीत कमी ७०० रुपये,जास्तीत जास्त १७०० रुपये तर, सरासरी १२०० रुपयांपर्यंत होता.
एक एकर नवीन लाल कांदा लागवडीसाठी दोन वेळा रोपे टाकली. कशीबशी लागवड केली मात्र कांदा पिकावर रोगाने थैमान घातले. महागड्या औषधांची फवारणी करुन कांदा पीक वाचविले. सद्यस्थितीत एक एकरातून सात ते आठ क्विंटल कांद्याचे उत्पादन आले. सद्यस्थितीत मिळत असलेला तीन हजार रुपये बाजारभाव बघता कांदा उत्पादनापासून मिळणारा नफा तर दूरच परंतु केलेला खर्चही निघणार नाही.
- गोरख पुंडलिक देवरे, शेतकरी
उन्हाळी कांद्याच्या तुलनेत सद्यस्थितीत नवीन लाल कांदा खाण्यास रुचकर असल्याने या कांद्याची मागणी वाढली असून बाजारभावही तेजीत आहेत. याचा परिणाम उन्हाळी कांद्याच्या मागणीवर झाला असून मागणीत घट आली आहे. त्यामुळे उन्हाळी कांद्याच्या दरात घसरण झाली आहे.
- संजय खंडेराव देवरे, कांदा व्यापारी