नाशिक (सुयोग जोशी) : महापालिकेच्यावतीने वेगवेगळ्या कामांसाठी भूसंपादन केलेल्या शेतकऱ्यांनी तातडीने माेबदला द्यावा तसेच पैसे बॉण्ड अगर टीडीआरने देऊ नये असा आक्रमक पवित्रा घेतला. विविध प्रश्नांचा भडीमार आयुक्त डॉ. अशोेक करंजकर व नगररचनाचे उपसंचालक हर्षल बाविस्कर यांच्यावर केला. याबाबत दहा दिवसात निर्णय घेण्याचे आश्वासन आयुक्तांनी दिले. शुक्रवारी सकाळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पंचवटी परिसरातील शेतकऱ्यांनी आयुक्तांची भेट घेतली.
मनपाने वेगवेगळ्या कारणासाठी गेल्या २० वर्षापासून आरक्षित करून ताब्यात घेतल्या आहेत. यात साधूग्रामची जागेचाही समावेश आहे. तसेच आगामी सिंहस्थासाठी प्रसंगी जागाही न देण्याचा इशारा काही शेतकऱ्यांनी दिला. न्यायालयाने आदेश देऊनही अद्याप मोबदला मिळालेला नाही. सध्या मनपातर्फे ठराविक बिल्डर्सला भूसंपादनचा मोबदला देण्यात येत आहे. हे करत असतांना अनेक ठिकाणी मिसिंग लिंक लक्षात घेऊन प्राधान्य क्रमाने मोबदला देण्यात यावा व सर्वात आधी शेतकऱ्यांना प्राधान्याने मोबदला देण्यात यावा. बिल्डर धार्जनी भूसंपादन योजना तत्काळ रद्द करण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी आयुक्तांकडे केली आहे. यावेळी शेतकरी राजाराम क्षीरसागर, शिवाजी गवळी, योगेश लोहकरे, समाधान जेजूरकर, रामकृष्ण गांगुर्डे, ज्ञानेश्वर कोठूळे, बाळासाहेब विधाते, प्रकाश शिंदे, संजय शिंदे, प्रकाश सूर्यवंशी, किरण थोरात, संजय पवार, सागर पवार आदी उपस्थित होते.सिंहस्थ समितीत शेतकऱ्यांना स्थान द्या
आगमी सिंहस्थाच्या पाश्व'भूमीवर जिल्हा आणि मनपा प्रशासनाच्यावतीने वेगवेगळ्या समित्या स्थापन करण्यात येतात. त्यात काय निर्णय होतो. याची आम्हाला माहिती होत नाही. अनेकवेळा काही गोष्टी चुकीच्याही होतात, चुकीचे निर्णय घेतले जातात. मग आम्ही सांगितल्यानंतर त्यावर सारवासारव केली जाते. त्यासाठी शेतकऱ्यांशी निगडीत सर्वच समित्यांवर स्थान देण्यात यावे अशी मागणी केली.