मालेगाव : गेल्या चार-पाच दिवसांपासून मालेगावी चकरा मारुनही युरीया मिळत नसल्याने तालुक्यातील संतप्त शेतकऱ्यांनी दुपारी रास्तारोको आंदोलन केले. तहसिलदार चंद्रजित राजपूत, तालुका कृषी अधिकारी व्यवहारे यांनी शेतक-यांची बैठक घेऊन तोडगा काढल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.मालेगावी कॅम्प रस्त्यावर गेल्या काही दिवसांपासून युरीया घेण्यासाठी शेतकरी रांगा लावत आहेत. शिवाय युरीयाची चढ्या भावाने विक्री होत असल्याने ग्रामीण भागामध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. आज कोणतीही सूचना न देता युरीया संपला असा फलक लावण्यात आल्याने शेतक-यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. राष्टÑवादी कॉँग्रेसचे दिनेश ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली केलेल्या रास्तारोको आंदोलन करण्यात आले. आंदोलनात तालुका कॉँग्रेस अध्यक्ष डॉ. राजेंद्र ठाकरे, संदीप ठाकरे, दिनेश पवार, शुभम पवार, मिरा खोमणे, शाहुबाई दळवी, रामदास कचवे, अर्चना अहिरे, अमोल पवार, अशोक वाघ, अतुल अहिरे, जयवंता गरुड आदी शेतकºयांनी सहभाग घेतला. युरीया संपल्याने संबंधित शेतक-यांनी तालुका कृषी अधिकारी व्यवहारे यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी बफर्स स्टॉकमध्ये चारशे गोण्या शिल्लक असल्याचे सांगितले. तहसिलदारांनी पुन्हा शेतक-यांची बैठक घेऊन शिल्लक असलेला युरीया वाटून टाकण्याची सूचना केली. त्यानुसार २५० शेतक-यांना प्रत्येकी एक-एक गोणी देण्यात आली. यावेळी पोलीस उपअधीक्षक रत्नाकर नवले, कॅम्प पोलीस ठाण्याचे निरीक्षक दिगंबर पाटील यांनी घटनास्थळी धाव घेत चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.
मालेगावी युरीयासाठी शेतकऱ्यांचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2020 3:57 PM