शैलेश कर्पे
सिन्नर (जि नाशिक) : तालुक्यातील पाटपिंप्री येथे भरदुपारी विहिरीत पडलेला बिबट्या जीव वाचविण्यासाठी विहिरीत धडपड करीत होता. हे पाहून परिसरातील शेतकऱ्यांनी विहिरीत दोरखंडाला सांगाडा बांधून बिबट्याला त्यावर बसण्यासाठी आधार दिला. शेतकऱ्यांनी वनविभागाची रेस्क्यू टीम येण्यापूर्वी शेतकऱ्यांनी प्रसंगावधान राखत बिबट्याला जीवदान दिले.
तालुक्यातील पाटपिंप्री येथील शिवाजी शिवराम उगले यांच्या शेत गट नंबर १४३ मधील विहिरीमध्ये अंदाजे वय दोन ते अडीच वर्षाचा बिबट्या भरदुपारी विहिरीत पडला. दुपारच्या दरम्यान उगले विहिरीकडे गेल्यानंतर त्यांना बिबट्या विहिरीत पडल्याचे दिसून आले. त्यांनी घटनेची माहिती परिसरातील शेतकऱ्यांना देऊन मदतीसाठी हाक दिली. बिबट्या जीव वाचवण्यासाठी विहिरीत पोहत धडपड करीत असल्याचे दिसून आले. शेतकऱ्यांनी घटनेची माहिती सिन्नरच्या वनपरिक्षेत्र अधिकारी मनीषा जाधव यांना दिली. वनविभागाची टीम घटनास्थळी दाखल होण्यापूर्वी शेतकऱ्यांनी लोखंडी सांगाड्याला बांधून तो विहिरीत सोडला. पाण्याच्या पातळीपर्यंत लोखंडी सांगाडा पोहोचल्यानंतर बिबट्याने त्यावर बसत आधार घेतला.
नाशिक पश्चिम उपविभागाचे उपवनसंरक्षक पंकज कुमार गर्ग, सहाय्यक वनसंरक्षक अनिल पवार, सिन्नरच्या वनपरिक्षेत्र अधिकारी मनीषा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली रेस्क्यू टीम यांच्या घटनास्थळी दाखल झाली. वनमंडळ अधिकारी एस. एम. बोकडे ,वनपाल व्ही. टी. कांगणे, मधुकर शिंदे, बालम शेख, रोहित लोणारे व शेतकऱ्यांच्या मदतीने वन विभागाने विहिरीत दोरखंडाच्या साह्याने पिंजरा सोडला. त्यानंतर बिबट्याला सुरक्षितपणे फिजिकली रेस्क्यू करून मोहदरी (माळेगाव)वन उद्यान येथे नेण्यात आले. शेतकऱ्यांनी प्रसंगावधान राखून विहिरीत सांगाडा सोडून रेस्क्यू टीम येईपर्यंत बिबट्याला जीवदान दिले. शेतकऱ्यांच्या प्रसंगावधानाचे कौतुक होत आहे.