पांगरी : सिन्नर तालुका दुष्काळी जाहीर करावा, शेतकऱ्यांची घर व शेतीची वीज तोडू नये, पांगरीमधून जाणाऱ्या महामार्ग कामामुळे सर्व व्यावसायिक उदध्वस्त झाले असून त्यांना पर्यायी जागा मिळावी, अशा विविध मागण्यांसाठी प्रहार संघटनेचे सिन्नर तालुका अध्यक्ष शरद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पांगरी येथे संत हरिबाबा मंदिराजवळ सकाळी दहा वाजता ठिय्या आंदोलन करण्यात आले.सिन्नर तालुका दुष्काळी जाहीर झालाच पाहिजे, पाणीपुरवठा योजनेची व शेतकऱ्यांच्या घराची व शेतीची वीज तोडणी मोहीम थांबली पाहिजे, कर्ज वसुली थांबवली पाहिजे, शेतकऱ्यांना विम्याची रक्कम मिळाली पाहिजे. खड्डेमय रस्ते दुरुस्त झाले पाहिजेत, अशा विविध मागण्यांचे निवेदन पाथरे वीज कंपनीचे सहायक अभियंता हर्षल मांडगे यांना देण्यात आले. यापुढे वीज कनेक्शन न तोडण्याचे आश्वासन मांडगे यांनी दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.या आंदोलनात दीपक पगार, शिवाजी गुंजाळ, विलास कलकत्ते, कदम, बंडू पगार, भास्कर उगले, सुरेश सानप, संदीप वारुळे, गणपत नाठे, पंचायत समिती सदस्य रवी पगार, दत्तू शिंदे, प्रसाद महाराज कानडी, पंकज पेटारे, भाऊसाहेब निरगुडे, चिंधु गुंजाळ, संदीप लोंढे, गणेश जाधव, धोकरट महाराज, समाधान गावंडे, गोकुळ पांगरकर यांच्यासह पंचायत समिती सदस्य रवी पगार, परिसरातील शेतकरी सहभागी झाले होते.