खामखेडा : गेल्या चार - पाच दिवसांपासून अचानक वातावरणात बदल होऊन ढगाळ व धुक्यामुळे शेतकरी चिंतातुर झाला आहे.यावर्षी पाऊस चांगला झाल्याने शेतकऱ्यांनी उन्हाळी कांदा, गहू, हरभरा आदि पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड केली आहे. आतापर्यंत पिकांसाठी पोषक वातावरण असल्याने पिकेही जोमात आहेत. आता शेतकऱ्यांचे पुढील सर्व आर्थिक गणित हे रब्बी हंगामातील उन्हाळी कांदा, गहू, हरभरा आदि पिकांवर अवलंबून आहे. कारण चालूवर्षी कोबी, टमाटे, लाल कांदा आदि पिकांना बाजारभाव न मिळाल्यामुळे कवडीमोल भावाने माल विकावा लागल्याने पिकांसाठी झालेला खर्चही भरून निघाला नाही. तेव्हा शेतकऱ्याने मोठ्या अपेक्षेने रब्बी पिकांची लागवड केली आहे. या ढगाळ वातावरणामुळे कांदा पिकावर मावा व करपा रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते, तर हरभरा पिकावर या धुके व ढगाळ वातावरणामुळे आळी पडण्याची शक्यता शेतकरीवर्गातून वर्तविण्यात येत आहे. गेल्या वर्षी उन्हाळी कांद्यास भाव न मिळाल्यामुळे व विहिरींना पाणी असल्याने गव्हाच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. सध्या गव्हाचे पीकही जोमात आहे. परंतु या ढगाळ वातावरणामुळे गव्हाच्या पिकावर ताबोरा रोगाचा प्रादुर्भाव होऊन गव्हाच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. या ढगाळ वातावरणामुळे शेतकरी चिंतातुर झाला आहे. (वार्ताहर)
हवामान बदलाने शेतकरी चिंतातुर
By admin | Published: January 17, 2017 10:48 PM