नाशिक : खरीप हंगामाकरिता शासनाकडून सुमारे २.२३ लाख मेट्रिक टन इतके आवंटन जिल्ह्यासाठी मंजूर झालेले असून १, ३२, १२३ मे.टन खत उपलब्ध झालेले आहेत. असे असतानाही जिल्ह्यातील अनेक भागांत युरियासाठी शेतकऱ्यांना जादा पैसे मोजावे लागत असल्याची तक्रार होत आहे. २७० रुपयांनी मिळणारी युरियाची गोणी ३०० रुपयांना विक्री केली जात असल्याने शेतकऱ्यांना नाहक आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.
खरीप हंगाम २०२३ करिता शासनाकडून युरिया, डीएपी, एमओपी, एसएसपी व संयुक्त खतांचे एकूण २.२३ लाख मे. टन खतांचे आवंटन नाशिक जिल्ह्यासाठी मंजूर करण्यात आले आहे. १८ जुलैअखेर जिल्ह्यात युरिया खत ३२२३१ मे. टन, डीएपी १३२७२ मे. टन, एमओपी २५६७, एसएसपी १४७६० मे. टन व संयुक्त खते ६९२४६ मे. टन असे एकूण १,३२,१२३ मे. टन खत उपलब्ध आहे. असे असताना दुसरीकडे रासायनिक खतांमध्ये युरियाचा मोठ्या प्रमाणात तुटवडा भासत आहे.
त्याचप्रमाणे खत दुकानांमध्ये युरिया शिल्लक आहे तिथे मात्र वीस ते तीस रुपये ज्यादा दराने युरियाची विक्री केली जात आहे. त्यामुळे ५० किलो युरियाची गोणी २७० रुपयाला असून ज्या खत दुकानांमध्ये युरिया शिल्लक आहे तिथे मात्र ३०० रुपयाला मिळत आहे. त्यामुळेच शेतकऱ्याची एक प्रकारे आर्थिक लूटच होत आहे.